Thursday, 16 March 2017

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात 

बळी मतदारांचाच!


धनंजय गुंदेकर - 9689043949


अनेक पक्षांना निवडणूक लढवण्यास मुभा देत असणाऱ्या संसदीय लोकशाहीतून अन कायद्यांतून आज मतदारांचा भ्रमनिरास होत आहे. लोकशाहीतील सत्तेसाठीच्या निवडणूक पद्धतीने आज जी देशभरात परिस्थिती निर्माण केली आहे त्यातून स्पष्टपणे मतदारांचा बळी जाताना प्रकर्षाने दिसून येत आहे. निवडणूक गोव्याची असो, मणिपूरची असो कि बीड जिल्ह्यातली येथे सत्तेची चावी असणाऱ्या बहुमताच्या मॅजिक फिगरसाठी विचार, विरोध विसरून सरकारी दाखवण्याचे औदार्य दाखवले जाते. 

   देशातील पाच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये दोन राज्यात भाजप सरकार बहुमतात आले. गोवा अन मणिपूरमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आले तर पंजाबमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवले. गोवा अन मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेल्या भाजपने अल्पमत असूनही सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरु केले आहेत. गोव्यामध्ये घोडा बाजार केल्याचा आरोप असलेल्या भाजप पक्षाने या राज्यातील सत्तेची शपथ अंतिम टप्प्यात आहे. एकूणच ज्यांच्या विरोधात प्रचार करून राजकारण केले त्यांचाच आधार घेत भाजपा आज त्या त्या राज्यातील मतदारांचा राजकीय बळी देत लोकशाहीचा खून घडवत आहे. 

  हे झाले देशपातळीवरील राजकारण मात्र असेच राजकारण बीड जिल्ह्याच्या राजकारणातही दिसून आले आहे. मतदारांनी अमक्या पक्षाचा विरोध म्हणून तमक्या पक्षाला निवडून द्यावे अन त्या आमक्याने निवडणुकीनंतर त्या विरोधी तमक्याचीच सत्तेसाठी कुबडी घ्यावी हे मात्र मतदारांना वेड्यात काढण्याचे धोरण राज्यकर्त्यांकडून बीड जिल्ह्यात सर्रास अवलंबले जाऊ लागले आहे. बीड पंचायत समिती सभापती निवड असो कि गेवराई पंचायत समिती सभापती निवड, या अभद्र युती पाठिंब्यातून मतदारांचा पक्ष, नेतृत्वावरील विश्वासाला तडा देणारे धोरण ठरत आहे. बीड पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीकडून सभापतीपदासाठी भारतीय संग्राम परिषदेला पाठींबा देण्यात आला तर उपसभापती पदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला. यातील बऱ्याच जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध भांसप, शिवसेना, भाजप अशी राजकीय टक्कर झाली होती. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मतदारांचा भ्रमनिरास झाला नसेल का? आघाडीने सत्तेत येऊ नये म्हणून स्थापन अभद्र युतीने बऱ्याच जणांचा राजकीय फायदा झाला असला तरी मतदारांचा तर यात राजकीय बळी गेलाच ना! 

  गेवराई पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही पंडितांविरुद्ध आग ओकणाऱ्या आमदार पवार यांना पंचायत समितीच्या सभापती निवडीत धक्का देत राष्ट्रवादीचे सरचिटणीस आ अमरसिंह पंडित यांनी शिवसेनेच्या बदामराव पंडित याना पाठिंबा देत सेनेच्याच दोघात तिसऱ्या पंडितांना सभापती बनवले. सर्वाधिक जागा जिंकूनही पवारांच्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात आले ते या अभद्र पाठींब्यानेच! आष्टी, शिरूरतही हेच घडले. आणि यापेक्षा येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या होत असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीतही अश्याच घोडाबाजाराचे नाहीतर अभद्र युतीचे दर्शन जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांना नक्कीच होणार आहे. बीड, गेवराई, आष्टी येथील पाठींबा बिनशर्त थोडाच दिलेला असणार आहे. 

  मतदार हा आपले अमूल्य मत पक्ष, व्यक्ती बघून देतो, कुणाला तरी डावलून मतदारांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला पसंद केलेले असते. मात्र हेच लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपल्या सोयीचे राजकारण करतात, ज्या पक्ष, आघाडीच्या विरोधात निवडून आलेले असतात त्यांच्याशीच जुळवून घेतात तेव्हा मात्र मतदारांच्या अपेक्षांचा भंग होतो. मुळात लोकशाहीतील बहुविध पक्ष रचनेने मतांचे विभाजन होऊन कोणताही पक्ष बहुमताने सत्तेवर येऊ शकत नाही. मग सत्ता स्थापनेत सुरु होतो एकतर आज चालू असलेला घोडेबाजार किंवा अभद्र युत्यांचा कारभार. हे लोकशाहीस हितकारक नसून अपायकारक आहे. भाजपासाठी सोयीचे असले तरी सशक्त लोकशाहीस नक्कीच घातक आहे.

शेवटी एक सोशल मीडियावर वाक्य बघून भारतीय लोकशाहीची अवस्था लक्षात आली 

.. हार कर जितनेवाले को बाजीगर कहते है!

.... और जितकर हारनेवाले को काँग्रेस कहते है!


... और बिना इलेक्शन जिते हुए सीएम बननेवाले को पर्रीकर कहते है!