Saturday, 3 December 2016

 युवा स्पंदनांच्या सोबत्यांनो ..  ... चला जग जिंकूया !



धनंजय गुंदेकर पाटील आंबेसावळीकर- 9689043949
   

युवा धोरणाचा विचार केल्यास आमच्या मराठवाडी-वैदर्भि युवकांचा विचार केला जातो का? तर माझे मत आहे सरकारला जे करायचे, व्यवस्थेला कुठे काम करायचंय, राजकारणी काय सेटलमेंट करतात अन मोदींनी काय दिवे लावायला पाहिजे याबाबत आपल्याला कट्ट्यावर चर्चा करायचीच आहे हो पण आपलं वय आपला उत्साह, उमेद आपण सोशल मीडिया अन वायफळ गोष्टींवर का खर्च घालत आहोत.


 आम्ही मागासलेल्या जिल्ह्याचे आहोत, आम्हाला मँनर्स कमी आहेत, मेट्रो जगणं माहित नाही, दर्जेदार शिक्षण,मॉल कल्चर, मल्टिप्लेक्स सगळं आम्हाला दूरचं .. असं म्हणण्याचे दिवस आता गेले.आज तुम्ही आम्ही ग्रामीण खेडूत, छोटे शहरातील युवा आता लॅपटॉप, अँड्रॉइड वापरतात.महिन्यातून एकदा औरंगाबाद,नागपूर,पुणे-मुंबईचा दौरा करून नव्या संकल्पनांचा अनुभव अभ्यास करत आहेत.जगभरात माहितीच्या क्रांतीचा लाभ घेताना दिसून येतात.

युवकांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे एक व्यासपीठ सध्या इन्स्पायर ठरत आहे ते म्हणजे YOUNG INSPIRATORS NETWORK या उपक्रमाचे युवकांचे आभासी मंत्रिमंडळ
युवकांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असे एक व्यासपीठ सध्या इन्स्पायर ठरत आहे....... ते म्हणजे YOUNG INSPIRATORS NETWORK या उपक्रमाचे युवकांचे आभासी मंत्रिमंडळ 



मी युवा तुम्ही युवा ...

     नवे पर्व युवा सर्व या सर्व घोषणा ऐकल्यानंतर आपण युवा असल्याचं जरा अंगावर शहारे येऊन जाणवतं .आज कोणत्याही वैचारिक गोष्टीच्या विषयावर खलबतं करण्यापेक्षा स्वैर युवकांच्या विचारसरणीवर लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.आपल्याकडे युवकांबाबतचा दृष्टिकोन आता बदलत आहे परंतु यात युवकांवर आजही पूर्णपणे विश्वास दाखवला जात नाही असेही दिसून येते.मी ज्या जिल्ह्यात राहतो त्या बीड जिल्ह्यासारखी सर्वांगीण पार्श्वभूमी असणारे जिल्हे राज्यभरात आहेत.आपण छोट्या जिल्ह्यातील खेडूत अशी भावना असणारे युवक या जिल्ह्यामध्ये दिसून येतात.या युवकांमध्ये काम करण्याचे जबरदस्त पोटेन्शियल असते.मिळेल ते काम पडेल त्या किमतीत करणारी हि युवा मंडळी आपली कार्यक्षमता पूर्णपणे वाया घालत असतात.आपण किंवा आपलाच भाऊ,मित्र,गावकरी पुण्या-मुंबईच्या बांधकामावर,कंपनीच्या कोंडवाड्यात खितपत पडत व्यर्थ घालत असतो.अत्यंत जुजबी कौशल्य असणारे आपण किंवा आपले भाऊबंद अत्यंत वाजवी दरात घाम गाळताना दिसून येतात

..मग किती दिवस आपण मुंबई-पुण्याच्या आशेवर जगणार आहोत, आपणच युवा आपले मंत्रालय आहोत.आपण आपल्यापासूनच बदल घडवू बाकी समाज आपोआप बदलतोच?


    आम्ही मागासलेल्या जिल्ह्याचे आहोत, आम्हाला मँनर्स कमी आहेत, मेट्रो जगणं माहित नाही, दर्जेदार शिक्षण,मॉल कल्चर, मल्टिप्लेक्स सगळं आम्हाला दूरचं .. असं म्हणण्याचे दिवस आता गेले.आज तुम्ही आम्ही ग्रामीण खेडूत, छोटे शहरातील युवा आता लॅपटॉप, अँड्रॉइड वापरतात.महिन्यातून एकदा औरंगाबाद,नागपूर,पुणे-मुंबईचा दौरा करून नव्या संकल्पनांचा अनुभव अभ्यास करत आहेत.जगभरात माहितीच्या क्रांतीचा लाभ घेताना दिसून येतात.

   मुंबईच्या रॉकस्टारला माहित नसलेले बँड आमचे गावठी पट्टे रिकाम्या वेळात प्लॅश्टीकच्य बॅरलवर डिंगडाँग वाजवतात.जग एका मायक्रोचिपने जवळ आणले अस्सल तरी  शहरी ग्रामीण युवकांमधील दरीची तफावतही दिसेनाशी केली आहे.उंच चहुबाजूने पहुडलेल्या विशाल डोंगराच्या कुशीत वसलेल्या पडल्यावरही सॅटेलाईटच्या माध्यमातून माध्यमातून पोहोचणाऱ्या विकासाच्या विकासाच्या  तरंगांचा लाभ आता खेडूत युवकांनाही होणार आहे.जग आता आपल्यासाठी समीप आले आहे.आता बस आपल्याला ते काबीज करायचे आहे. जानो तो आसान , और मानो तो मुश्किल , असे हे जग जिंकायचं काम आता आपल्या दृष्टीच्या व्याप्तीत आले आहे.माध्यमाचा वापर, कामात सातत्य, धीर, आपल्या परिस्थितीची जाण, यशस्वी होण्याची प्रचंड इच्छाशक्तीच्या  जोरावर अशक्य ते शक्य करून
दाखवायची धमक आपल्यात एकवटायचीय, सदैव मनोबल  खच्ची  करणाऱ्यांच्या मानगुटीवर बसून आपल्या यशाचा वारू चौफ़ेर उधळायचा असेल तर  सर्वसमावेशक विचारसरणीही ठेवायला पाहिजे.अननुभवी, मस्तीखोर, उथळ, अजाणतेचे कलंक आता बाजूला सारून कल्पकता, जागरूकता, परिपक्वता, सृजनशीलतेचा अविष्कार युवकांबाबत अविस्वास दाखवणारांना धाखावायाला हवाच.बसल्या जागेवर कोणत्याही विषयाची माहिती जर एका क्लिकवर मिळत असेल अन त्याची शहानिशाही तेथेच होत असेल तर आपण मुंबई-दिल्लीचे असण्याची काय गरज आहे.आताच्या युवानमध्ये गरज आहे ती काहीतरी करण्याची पॅशनची, छोट्या खेड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक तंत्राच्या अवलंबनाची, अमेरिकेच्या गोल्डन गेटच्या धर्तीवर आपल्या छोट्यामोठ्या कंपनीत कार्य करण्याची, युरोपच्या विकासापासून काहीतरी तथ्य घेऊन आपल्या विचारात बदल करण्याची अन समाजात सकारात्मक बदल घडवण्याची!

           आपल्याकडे मोफत सल्ला केंद्रे पावलोपावली मिळतील, ८० % युवकांच्या आयुष्यात या मोफत सल्लागारांच्या सल्ल्याने निर्णय चुकले आहेत. या मोफत सलगारीच काम आपणही कधीकधी करून जातोत किंवा आपल्याला माहित असते पण आपण त्याला योग्य रास्ता दाखवत नाही.अहो आम्ही युवा उद्याचे भविष्य आहोत, आज जर  अनुभवी लोकांकडून मार्गदर्शभावी आमची प्रगती रोडावली असेल तर तुम्ही  अननुभवाला दोष कसा देता.सध्याच्या माहितीच्या युगात १२ वर्षाचे पोरग जरी नोटबंदीवर पंतप्रधानांना सल्ला देत असेल तर त्यालाही त्यातली काहीतरी माहिती आहेच ना? याबाबतही बराच कल्लोळ माजतो कि इंटरनेट मुळे प्रचंड प्रमाणात अनैसर्गिक माहिती मुलांना अगदी कमी वयात मिळते .हे १०० % बरोबरही असेल मात्र आपण ज्या भारत देशात राहतो त्या देशातील कित्येक युवक आपल्या आयुष्यातील साहचरणीला आजही लग्नादिवशीच भेटतात, बोलतात. याबाबतच इतके स्वतंत्रता असेल तर लैंगिक शिक्षणाबाबत तर कमालीची गुप्तता पाळताना माहितीच्या धोरणाबाबत बोलणारे विचारवंत कुठे असतात.शासन धोरणानुसार १६ व्या वर्षाच्या आसपास लैंगिक शिक्षण दिले जाते.याबाबत अभ्यासक्रमातही अंतर्भाव असतो पण ९० % शाळांमध्ये हा विषय शिकवला जातच नाही. 

       जेव्हा आमच्या युवा मित्राला आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याचा असतो तेव्हा जवळपास ७० % विध्यार्थी आपल्या पालकांच्या सांगण्यावरून आपला निर्णय घेतात.इन्व्हरमेंट आवडत असते तेंव्हा अभ्यास मात्र इंजिनेरींगचा करावा लागतो,त्यात पास होतात, नोकरी लागते,चाळीशी पार होते अन आयुष्याची उमेदीचे वय संपल्यानंतर युवा असण्याचे महत्व कळते.अरे आपण आज युवा आहोत याचे भान ठेवा.जगताना आवड जपा, आपली पॅशन साकारा,आवडीच्या लोकांसोबत रहा, कुणालाही नाराज करू नका, आपल्याला जिंकायचे असेल तर सर्वाना आपलेसे करण्याचा प्रयत्न करा  आयुष्याच्या शेवटी आपल्या कामाची पावती चित्रगुप्तकडे पोहोचण्याआधीच करोडोंची शिफारस आपल्यासाठी तेथेपण गेली पाहिजे हेच जीवनाचे अंतिम सत्य बाकी सर्व निव्वळ वायफळ देखावा आहे.


हे बघ दोस्ता आपल्याला जग जिंकायचय  ... 



ये जो काम है ना ... 


मानो तो मुश्किल और जानो तो आसान 




Friday, 2 December 2016

अर्ध्यावरती डाव मोडला, 

अधुरी एक कहाणी...


संभाजी कदमांचे स्वप्न अधुरेच राहीले......



धनंजय गुंदेकर



फेब्रूवारी 2017 साली पोस्टींग दिल्लीला होणार होती,तिकडे जाण्यासाठी रिझर्वेशन करण्याची तयारीही सुरु झाली होती.एकदोन दिवसांत ते ही पुर्ण झाले असते.कुटुंबियांसह दिल्लीला जाण्याच्या संभाजी कदमांच्या मानसावर नियतीची सारीपाट सुरु झाला, मंगळवारी पहाटे पाकाड्यांच्या दहशतवाद्यांकडुन झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मराठा लाईट इन्फंन्ट्रीचे भुमिपुत्र संभाजी यशवंत कदम देशासाठी शहीद झाले.देशभर या बातमीने शोककळा पसरली.या अर्ध्यावरतीच्या डाव मोडल्याने, एक अधुरी कहाणी पुन्हा नांदेडमध्ये घडुन आली...........


    सुटीवर आल्यानंतर बालाजीच्या दर्शनाला जाण्याचे आश्वासन संभाजींनी आपल्या आईला दिले होते परंतु आता त्या आईने कुणाकडे पाहायचे... पोटचा गोळा म्हणुन? एकुलता एक लेक काळाच्या पडद्याआड जात असताना बघुन काय वाटत असेल त्या माऊलीली? बातमी समजताच पत्नी शितल अंथरुणालाच खिळवुन बसली आहे, तीन वर्षाच्या तान्ह्या मुलीला घेऊन आईच्या प्रत्येक हुंदक्याला आपल्या मुलाची आठवण बाहेर पडत आहे.येणार्या-जाणार्याकडे कावरेबावरे नजरेने बघणार्या वडीलांचा कंठ दाटुन येत होता.दररोज कित्येक घरे उध्वस्त होत असतील तर एकदाच त्या पाकाड्यांचा ठावठिकाना सरकार का लावत नाही असा सवाल शहीद संभाजींच्या वडीलांनी सरकारला केला......

  असाच एक आघात नांदेड जिल्ह्यावर एप्रिल 2012 साली झाला होता.कुटुंबातील कर्ते व तरुण पोलिसांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.अर्धापुर येथील महेश डांगे अन् भोकर तालुक्यातील कोळगाव येथील पांचाळ माधव या अत्यंत विपरित परिस्थितीचा सामना करुन पोलीस झालेल्या युवकांचा अपघातातील शहीद होण्याची आठवण पुन्हा संभाजी कदमांच्या शहीद होण्याने उजागर झाली आहे.नांदेड येथील पोलिस दलाच्या फायर ग्राउंडवर झालेल्या
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन पोलिसांपैकी एक महेश
गोपीनाथ डांगे हा अर्धापूरचा रहिवासी. तर दुसरा माधव पांचाळ हा कोळगाव ता भोकर जि नांदेड येथील अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगणार्या घरातला कर्ता माणुस होता.

 वयाच्या 18 व्या वर्षी सैन्यात भरती झालेल्या संभाजींकडे आपल्या जानापुरी गावात दिड एकर जमिन होती.आई-वडील,पत्नी,3 वर्षाची मुलगी, दोन बहीणी विवाहीत असलेल्या संभाजींचे आयुष्य एेन उमेदीत असतानाच काळाने घाला घातला.......

   
शेवटी......अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी... राहीली


💐🙏शहीदांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏💐


Thursday, 24 November 2016

बीड नप ..एक्झिट पोल!

धनंजय गुंदेकर, बीड 9689043949


अतिशयोक्ती ठरणार नाही परंतु महाराष्ट्रातील सर्वाधिक रंजकता अन अनिश्चितता असलेली नगरपरिषद निवडणूक  हि बीड नगरपरिषदेची नक्कीच असणार आहे.संबंध महाराष्ट्राचे लक्ष एकवटत या राजकीय पंढरीच्या राजधानीचा अनभिषज्ञ सम्राट कोण हे बघण्यास आता जनतेची उत्सुकता चांगलीच उत्कंठ होत चालली आहे.या निवडणुकीत दमदार नेत्यांचा चांगलाच कस लागल्याने हि निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे हे सांगण्यास कोणत्या ज्योतिषाची गरज नाही.सध्या लोकल एक्झिट पोल कोणत्याही एकाला प्रबळ भावी म्हणून निवड करू शकत नसताना मात्र आपलाच नगराध्यक्ष विजयी होणार असल्याचे एक्झिट पोल साध्य ऑनलाईन धुमाकूळ माजवताना दिसून येत आहेत.


  एखादी संस्था किंवा समूह कोणत्याही पक्षाला बहुमत आहे स्पष्ट सांगत नसल्याने नक्की निवडणुकीपूर्वीचा एक्झिट पोल सध्या तुरळक दिसून येत आहे.भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी,शिवसंग्राम,काकू-नाना आघाडी,एमआयएम सारखे जनमत असलेक्या पक्षांनी दमदार उमेदवार नगराध्यक्ष पदाला मैदानात उतरल्याने सहाही दिशांनी प्रचाराचा धुडगूस माजविला जात आहे.यातून या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व मतदान होणार हे मात्र नक्की ..


या निवडणुकांमधील विशेष मुद्दे 


@ या निवडणुकीत सर्वाधिक मतदान घडून येणार 


@ बीड शहर निवडणूक प्रक्रियेत अभूतपूर्व ढवळल्याने लोकांमध्ये राजकीय जनजागृती बऱ्याच प्रमाणात घडून आली आहे .. 


@ लोकसभा-विधानसभेनंतर निवडणूक प्रक्रियेतील बदल या निवडणुकात दिसून येत आहेत.यातून यावेळी तंत्राधारित निवडणुकीवर भर देण्यात आला . 

@ कार्यकर्त्यांच्या डोअर टू डोअर प्रचाराला बळ मिळाले 


@ यावेळेस आश्वासनांचा भडीमार बऱ्याच प्रमाणात थंडावला आहे.शिवाय वचननामा हा परिपूर्ती करता येणाऱ्या योजनांचाच आहे. 


@ केंद्र व राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपने आपला वचननामा सर्वांगीण विकासावर भर देणारा ठेवला आहे , तर नपवर सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने उर्वरित विकासकामांच्या पूर्ततेवर भर देणारा बनविला आहे.


@ यावेळेस बाहेरून येणाऱ्या बड्या नेत्यांच्या सभांचा बऱ्याच अंशी फरक दिसून आला नाही .. म्हणजेच स्थानिक बळावरच हि निवडणूक लढवली जाणार आहे .. 



या सर्व बाजूंचा व शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार केल्यास णपची सत्ता कोणाकडे हवी हा प्रश्न मतदारांना विचारल्यास त्यांचे उत्तरही मौन असते.शहरातील मतदार आपले अमूल्य मत राजकीय कुरघोडीपासून लपवत गुप्त ठेवण्यास प्राधान्य देत आहेत.परंतु जात, धर्म, पक्ष, पैसा माणुसकीच्या पुढे कुठेतरी सलीम जहांगीर, क्षीरसागर बंधू रेसमध्ये चांगलेच पुढे दिसत आहेत.परंतु शिवसेना, शिवसंग्रामकडूनही जोर का झटका लग शकता है ! हेही विसरता येणार नाही.... 

Friday, 28 October 2016

आता बस झाले आश्वासनांचे तोरण न.प.च्या मतदारांना हवय विकासाचे धोरण 


धनंजय गुंदेकर-beed 9689043949



नागरी भागातील जीवनाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सतत वाढत असून शहरी भागातील वाहतूक, घरांची समस्या, अस्वच्छता, घनकचरा विल्हेवाट, वाहतूक इत्यादी विषयांचे निराकरण महत्वाचे झाले आहे.आपल्या बीड जिल्ह्यातील नगरपरीषदचा आतापर्यंतचा कारभार बघितला तर येणाऱ्या निर्वाचितांसाठी कामाचा ढिगाराच पडलेला आहे.बकाल शहरे अन अस्वच्छ जीवनपद्धतीने आपले अतिमागास जीवन आपल्याला त्रासदायक तर आहेच शिवाय आपली बाहेरही नाचक्की करणारे ठरत आहे.या परिस्थितीला जेवढे सर्वसामान्य जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार शहर विकासाचे धोरण ठरवणारे राज्यकर्तेही आहेत.निवडणुकांमध्ये उमेदवारांना विकास करण्यात आपण किती सक्षम आहोत याचे धोरणच मतदारांपुढे जाहीर करावे लागणार आहे.



  स्वराज संस्था निर्मितीमागची प्रेरणा ही सत्तेचे विकेंद्रीकरण स्थानिकलाच होऊन व्यवस्थेत सुशासनातून नागरिकांच्या समस्यांची सोप्यापद्धतीने उकल होण्याकरता करण्यात आले होते.त्याचा चांगला परिणामही उत्तरोउत्तर दिसून येत आहे.यातील निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाही बाळकटीकरणाला प्राधान्य मिळाले.सुरुवातीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांना बरेच अधिकार होते त्यातून निर्वाचित लोकप्रतिनिधी लोककल्याणाची कामे करायचे.परंतु काळाबरोबर स्थानिकच्या अधिकारांमध्ये कमीजास्तपणा आला.आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज संस्थांतील शहरी विभागाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात कार्यक्रम येऊन ठेपला आहे.परंतु राज्यातील महत्वाच्या गटबंधनाची गरज असणाऱ्या पक्षांचे धोरणच जाहीर करूनही निश्चित नसल्याने उमेदवारांच्या संभ्रमातून संधिसाधूंनि चांगलीच उचल खाल्ली आहे.शहर विकास धोरणाच्या अभावातूनच पक्षप्रचार जोरदारपणे चालवणे हेच धोरण सध्या सर्व पक्षांमधून चालवले जात आहे.आपली उमेदवारी पक्की नाही हे दिसताच दुसऱ्या पक्षातून आपले नाण्याचा खणखणाट होतो का हे पाहणारे महाभागही मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातील नपच्या निवडणुकांत दिसून येते आहे. 


   पक्षाचा आदेश, वैचारिक अधिष्ठान, अजेंडा गुंडाळून ठेऊन काही बंडखोर अपक्ष तर काही दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात धरतात.यातून राजकीय खुमखुमीच्या उमेदवारांच्या कोलांटउड्या चांगल्याच उडत आहेत.जिल्ह्यातील राजकारण देशभरात सर्वश्रुत आहे.येथे जितके उमेदवार एका नपला असतात तेवढे उमेदवार बिहारच्या विधासभेला नसतील.सर्व पक्ष सुरुवातीला स्वतंत्र्य लढण्यासाठी अतातुर झाले होते परंतु सेना भाजप युती राज्यभरातील नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये होणार असल्याचे कालच जाहीर झाले परंतु याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिकला देण्यात आला आहे.यातून कुठे तुटते अन कुठे जुटते हे बघण्यासारखे आहे.काँग्रेस अन राष्ट्रवादीचे अजून सगळे अधांतरीच आहे.कोण कसे लढणार याचाच मेळ बसत नसल्याने मतदारही आपला कौल मौन राखत आहेत. 

 

स्थानिकाच्या आखाड्यात त्या त्या शहराच्या विकासासाठी कोणते धोरण राबविण्यात येणार याबाबत कोठेही वाच्यता नाही.भावींच्या प्रसिद्धी पत्रकातून सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मिळत आहे परंतु मतदार याबाबत आता सजग आहेत.निवडणुकाला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आता आपला प्रभाग विकासाचा अन नगराध्यकांना शहर विकासाचा राबविण्यात येणाराच विकास आराखडा सादर करावा लागणार आहे.यंदाच्या निवडणुकांमध्ये उदंड झाले भावी असा प्रकार दिसून येत आहे.यातून कित्येक नगरसेवक पदासाठी योग्य आहेत हे त्यांनाच माहिती.

 आरोग्य, वाहतूक, प्रदूषण, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा इत्यादी सुविधा शहरातील सर्वांना कशा उपलब्ध होतील यासाठीच्या धोरणाची आखणी अन अंमलबजावणी कशी करणार याचे विश्लेषण अन वर्णन आपल्या शहरातील अन वॉर्डातील प्रत्येक मतदाराला आता समजावून सांगण्याची जबाबदारी सर्व उमेदवारांची आहे.बरेच नेते आता पक्षांतून कोलांटउड्या मारतात तसेच आता बरेच मतदारही आपले हित बघत आहेत अन यांची संख्या निकाली आहे यामुळे आपला विकास अजेंडा सर्वसमावेशक कसा राहील याकडेही सर्वांना लक्ष द्यावे लागणार आहे.बीड, अंबाजोगाई सारख्या मोठ्या नगरपरिषदांमध्ये विकासाचे धोरण कुणाचे चांगले आहे हे जाणून आपले अमूल्य मत देणारे मतदारही आहेत.शेवटी प्रत्येक उमेदवाराला आपला विजय होणार हे आपल्या सोबतच्या व साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीवरून वाटत असते परंतु आपले मतदार हे आपले कार्यकर्ते किंवा अनुयायी नसतात त्यांना आपण कितपत योग्य आहोत हे दाखवून किंवा आपले धोरण प्रभागासाठी कसे हितकारक आहे हे समजून सांगावे लागेल.यात आता जात, पक्ष स्वभाव या गोष्टीचा परिणाम होणार असला तरी अन सर्व समाजाचे मोर्चे निघून कास्टबेस राजकारण होईल असे वाटत असले तरीपण मतदार हा आपला विकास बघणारच अधिक आहे परंतु यातून कास्ट या प्रकारच्या राजकीय संधिसाधूपणाचा फॅक्टर परिणामकारक ठरणार आहे हे पण तितकेच खरे.

  हे सर्व सोपस्कार सांभाळत पक्ष किंवा अपक्ष तिकिटावर लढण्यास सज्ज झालेल्या प्रत्येक उमेदवाराला आता आपला विकास अजेंडा मतदारांपुढे सादर करावा लागेल अन त्याच्या परिपूर्णतेचा आश्वासनही द्यावे लागेल. 

Wednesday, 26 October 2016

 राजकारणाचा विकास जनता मात्र मागास

सदैव चर्चेत असणाऱ्या बीड जिह्याचे दुर्दैव 

------------------------------------------------------

धनंजय गुंदेकर-बीड 

 जो व्यक्ती बीड जिल्ह्याच्या राजकारणात यशस्वी होतो त्याला नंतर कोणाचेही मार्गदर्शन घेण्याची गरज नाही असे महाराष्ट्रातील जाणकार राजकीय जाणकार सांगतात. राष्ट्रीय राजकारणात मात्तबर पुढारी देणारा बीड जिल्हा गेल्या दोन दशकांपासून राजकीय चर्चेच्या गर्तेत असतो.येथे देशभरातील प्रत्येक पक्ष अन त्या पक्षाचा नेता मिळेल.संघटना तर उदंडच.परंतु राजकीय क्षेत्रात बोलबाला असणाऱ्या या जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत सर्वत्र अबोलाच दिसून येतो.सध्या रेल्वे नाही, विमानतळ नाही, महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग नाही, उद्योगाचे हब नाही, दर्जेदार शिक्षणसंस्था नाही, सर्व काही अभावाचे असताना मात्र राजकारण सर्वात आघाडीवर दिसणारा देशातील एकमेव जिल्हा म्हणजे बीड.


बीड जिल्हा म्हटलं कि काहींना ऊसतोड कामगार दिसतात, काहींना मुंडें-महाजानांचा जिल्हा दिसतो.उघड्या-बोडख्या डोंगराळ प्रदेशाचे अधिक्य असणाऱ्या या जिल्ह्यातील शेतीवरील अर्थव्यवस्था अतिशय तकलादू असल्याने अर्ध्या पेक्षा जास्त लोकसंख्या कोयत्याच्या आधारावर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र किंवा राज्याबाहेर जाते.या जगातील सर्वात मोठ्या स्थलांतराचे कित्येक दूरगामी परिणाम  दैनंदिन व्यवहारात दिसून येतात.मग प्रश्न पडतो देशाचे नेतृत्व करणारे नेते या जिल्ह्याने दिले मी विकास कसाकाय झाला नाही? याचा अभ्यास केल्यावर उत्तरही मिळते.मुळात आपल्या मागासपणाला जितके येथील राजकारणी कारणीभूत आहेत तितकेच राज्याचे नेतृत्व करणारे नेतेही करणीभूत आहेत.जिल्ह्यातील नेतृत्वाचा बराचसा काळ हा संघर्षाचाच राहिलेला आहे.हैद्राबादच्या निजामाच्या जुलमी कचाट्यातून सुटल्यानंतर कामगारांचा पुरवठा करणारा जिल्हा हा एकमेव ओळख घेऊन बीड जिल्हा स्वातंत्र्यप्राप्तीपासून विकासासाठी संघर्ष करीत आहे.जिल्ह्याचे नेतृत्व जेंव्हा जेव्हा देशाच्या सर्वोच स्थानी पोहोचले तेव्हा प्रत्येक वेळी नियतीने त्याचा घात केला.त्या प्रत्येक नेतृत्वाला सत्तास्थानी असताना आपल्या जिल्ह्याचा विकास करावा वाटला असेलच ना? आज आरोप होतात मुंडे-महाजनांनी जिल्ह्यात फक्त राजकारण केले विकास नाही केला.त्यात काही तथ्य असले तरी मात्र मुंडेंसारख्या लोकनेत्यांना विकासकामांच्या योजनबाबत प्रचंड अडवणूकही झालेली आहे.महाजनांनी जरी देशाच्या राजकारणात महत्वाचा रोल निभावला असला तरी त्यांनी बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना आजही लोकांमध्ये बोलून दाखवली जाते.परंतु मुंडे साहेबांची बहुतेक कारकीर्द विरोधी बाकावरच गेल्याने त्यांना जिल्ह्याचा म्हणावा असा विकास करता आला नाही.अपवाद फक्त युती काळातील उपमुख्यमंत्री पदाचा.त्या काळात त्यांना शक्य होईल तेवढे विकासकामं साहेबांनी केले होते.येन उमेदीच्या काळातील काळाच्या घाल्याने तोंडापर्यंत आलेला जिल्ह्याच्या विकासाचा घास नियतीने हेरावून घेतला.जेव्हा जेव्हा जिल्ह्याच्या विकासाबाबत चर्चा होते तेव्हा तेव्हा मुंडेंनाच धारेवर धरले जाते.मग काय या जिल्ह्यावर मुंडेंचीच एकहाती सत्ता होती का?
सहा विधानसभांच्या आमदारांनी का नाही जिल्ह्याच्या विकासाबाबत काही केले.मुळात बीड जिल्ह्यातील राजकारण्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांच्या अंतर्गत राजकारण करावे लागत असल्याने त्या प्रदेशाच्या विकासाचेच धोरण आजपर्यंत आखले गेल्याने बीड जिल्ह्यातील नेते राजकीय बडेजावातच राहून बीड जिल्हा मागास राहिला.

जिल्ह्यातील भरमसाठ कामगार वर्ग जर स्वावलंबी झाला तर पश्चिम महाराष्ट्रातील, पुण्या-मुंबईतील कारखानदारांचे  कामगारांभावी दिवाळे निघाले असते.यातून तिकडच्या सहकार लॉबीने येथील पुढाऱ्यांना पक्षीय जहागिऱ्या बहाल करून राजकारण माजविले.राज्यातील राजकारणावर सर्वाधिक खर्च करणारा जिल्हाहि बीडच आहे.गावपातळीवरून ते जिल्हापातळीपर्यंतच्या निवडणुकांमधील बहुतेक पैसे हे शेत विकून खर्चिलेला असतो.अशा या राजकारणात आता जिल्ह्यातील युवकही मोठ्या संख्येने आहारी जाऊन नैराश्यात गुंतत आहेत.कोणत्याही प्रकारचा विकास नसताना राजकारण प्रसिद्ध असणाऱ्या बीडची ओळख राज्याचे बिहार म्हणून त्यामुळेच करून देतात.

 खरे तर युवकांनी आता वेळ आपला विकास करून घेण्याची आली आहे हे समजून घ्यायला हवे.सतत अवर्षण असणाऱ्या या जिल्ह्यातच रोजगार निर्मितीचे केंद्र कसे निर्माण होईल हे पाहायला पाहिजे.दर्जेदार शिक्षणासाठी संघर्ष करायला पाहिजे, शास्वत विकासाच्या धोरणाचा अंगीकार जिल्ह्याच्या नियोजनकर्त्यानी कसे राबवावे यासाठी दीर्घकालीन आंदोलन उभारायला पाहिजे, नुसत्या राजकारणात उद्या मारण्यापेक्षा विकासाच्या राजकारणाला सुसंगत साथ दिली पाहिजे.उदंड राजकारणासोबत उदंड विकास कसा होईल याकडेही लक्ष दिले पाहिजे.

Tuesday, 25 October 2016

"उदंड झाले युवानेते"

राजकारणात युवकांचा बोलबाला कि फक्त वापर?

धनंजय गुंदेकर 


आताच्या राजकारणातील युवकांचा सहभाग बघितल्यानंतर नव्वदच्या दशकातील जाणकार नेत्यांच्या आवाहनाची आठवण येते.राजकारणात युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जाणकार पुढारी करायचे तेव्हा राजकारणात युवकांचा समावेश नगण्य होता..ऐंशी-नव्वदच्या दशकात भारतीय तरुण राजकीय घडामोडींपासून अलिप्त राहिल्याने राजकारण कंटाळवाणे झाले होते.प्रौढ-वयस्क मंडळींचा ठेका राजकारणावर जाम बसलेला असायचा.यातून राजकीय अजेंडा, योजना, परिकल्पना राबवताना रटाळ गती राहायची.बदलत्या राजकीय घडामोडींमधून वाढत्या युवा देशाला राजकारणात युवकांची गरज भासू लागली.यातूनच हुशार राजनेत्यांनी देशातील नवयुवकांना राजकारणात ओढून घेण्यासाठी प्रेयत्न करायला सुरु झाले.एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर युवा नेते हि संकल्पना रुजू लागली.२००४ व २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या युवा फळीने निकालात महत्वाची भूमिका निभावल्याने युवकांकडे जबाबदारीने पहिले जाऊ लागले.यातूनच स्वातंत्र्यानंतर राजकारणात यशस्वी झालेल्या नेत्यांचे वारसदारही राजकारणात वारसाहक्काने शामिल झाले.अशा या दुहेरी फायद्यासाठी जाणकार राजनेत्यांनी युवकांना राजकारणात आकृष्ठ केले.आजघडीला त्या आवाहनातून देशातला प्रत्येक तरुण राजकारणाशी जोडला गेला आहे.परंतु धडाडीचे, चैतन्य, काही तरी करण्याची जीतासु इच्छा असणाऱ्या तरुणांचा भरणाच वाढल्याने "उदंड झाले राजकारण" म्हणण्याची वेळ आली आहे. 
----------------------------------------------------------------------------------------------
पक्ष-नेत्यासाठी जीवाचे रान करणारे कार्यकार्ते सध्या उघडे-नागडे झालेले आहेत.तरी पण उदंड झाले युवानेते!
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात तयार झालेल्या नेतृत्वावर सगळ्यांचा विश्वास होता.त्यातूनच पुढे नेहरूजींनी १७ वर्षेपर्यंत पंतप्रधान पदावरून देशाचं कारभार हाकला.यानंतर इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदीसारखे प्रौढ पंतप्रधान असणारा देश हा जगातील सर्वाधिक युवा देश समाजाला जातो.एकविसाव्या शतकानंतर देशातील राजकारण युवा मतदारांवर निर्भर झाले होते.यातून राजकारणातील जाणत्यांना युवकांचा समावेश राजकारणात गरजेचा वाटू लागला.२००४ व २००९ अन २०१४ च्या लोकसभा निवडनुकांमधील विजयी बसरकार हे युवकांच्या मताधिक्यावरूनच निवडून आल्याचे जाणल्यानंतर देशातील सर्व पक्षांनी युवकांना जास्तीत-जास्त आकर्षित करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली.यातूनच पक्षाच्या फादर संघटनाइतकेच युवासंघटनांच्या बांधणीकडेही जोर देण्यात आला.आता झालेल्या २०१४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमधील प्रचारातही युवकांना आकर्षित करणारा प्रचार नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनखाली भाजपने राबविला अन अभूतपूर्व विजय मिळवला.लोकसभेनंतर विधानसभा, विधानसभेनंतर स्थानिक स्वराज संस्थानाच्या निवडणूक अन त्यात भर सहकारी संस्था निवडणुकांची यामुळे सक्रिय राजकारणात पूर्णवेळ सहभाग नोंदवणे प्रत्येक पक्षाला गरजेचेच बनल्याने यात महत्वपूर्ण असलेल्या युवा शक्तीचा पुरेपूर वापर केला जात आहे.एखादा चाणाक्ष हाताखाली धरून त्या परिसरात आपला अजेंडा राबवणे हा आता एक रुढार्थ कारभार चालू आहे.आपल्या पक्षासाठी,नेत्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या त्या सामान्य कार्यकर्त्याला त्या नेत्यासाठी ना घर दिसते कधी ना आपले भविष्य! आज अशा परिस्थितीतून महाराष्ट्रातील कित्येक होतकरू युवकांचा फक्त वापर करून घेतला जात आहे. बेसुमार संघटना, पक्ष, जातीय संघटना, चळवळींमधून सोयीनुसार बनवलेल्या पदाच्या कोंदणात अडकवून आपल्या हिताचे काम करून घेणाऱ्या पुढाऱ्यांना त्या आपल्या कार्यकर्त्याच्या हिताची अजिबात पर्वा नसते.
  आज देशाची अत्यंत महत्वाची कार्यक्षमता या राजकारणापायी व्यर्थ कामांमध्ये वापरून नाहीशी होत आहे.माहिती क्रांतीच्या विस्फोटातून लहानसहान लेकरही राजकारणापासून अलिप्त राहिले नाहीत.यातूनच पुढे युवानेत्यांची फौज बनायला सुरु होते अन नेत्यांपयी आपल्या आयुष्याची राखरांगोळी लागेपर्यंत ती शांत बसत नाही.आपल्या देशात राजकारण हे कास्ट बेस माजवले जाते यातून बिनखर्चिक अनुयायी मिळतात अन हे अनुयायी असतातच मुळात कमी वयाचे.पुढे राजकीय भविष्य बघून शिक्षणाला दांडी मारणाऱ्या या युवा नेत्यांचे हाल कोणी विचारात नाही.
आताचे राजकारण हे पाहिल्यासारखे राहिले नाही अन त्यात सर्वसामान्यांना आपला आवाजही उठावात येत नाही.जर असे बोलले तर घराणेशाही, हुकूमशाहीला प्राधान्य मिळते असे बोलणारच नंतर कोण्यातरी पुढाऱ्याच्या समोर लोटांगण घेऊन त्यांच्या एकनिष्ठतेची शपथ घेतात.मग प्रश्न पडतो युवकांनी राजकारणात येऊ नाही का ? तर यावे परंतु गरजेपुरतेच.आपण समाजात बदल घडवण्यासाठी जेव्हा राजकारणात उतरतो तेव्हा आधीच्यांच्या बनवलेल्या दलदलीत अडकून आपणही त्यांच्यासारखेत होतोत मग कसले परिवर्तन? राजकारणात नव्या युवकांनी येतानाच विचाराशी तडजोड नाही या ठाम भूमिकेवर टिकून राहिले तर "उदंड झाले राजकारणी" म्हणण्यापेक्षा परिवर्तनाची लाट हा शब्द वापरावा लागेल.   

धनंजय गुंदेकर 
9689043949
dhananjaygundekar5@gmail.com