Tuesday, 30 May 2017

जळी-स्थळी-काष्ठी ना. पंकजांवर फक्त आरोपांच्या फैरी

संघर्षशील नेतृत्वाची मात्र विकासात्मक भरारी

व्यक्तिविशेष 


एखाद्या नेतृत्वावर गल्ली ते दिल्ली आरोप होतात, पक्षांतर्गत राजकारणात पाण्यात पहिले जाते, विरोधकांकडून घरातच कडवा विरोधक उभा केला जातो, मनातील अपेक्षा बोलून दाखवल्याने प्रसारमाध्यमांच्या तोफेसमोर पदोपदी उभे केले जाते मात्र संघर्षाच्या वारसदार या अशा आरोपांच्या फैरींचा, अतार्किक विरोधाचा कणखरपणे सामना करत आपल्या बेजोड नेतृत्वाच्या जोरावर विकासात्मक भरारी घेते.  या भरारीच्या अवाढव्यतेने राज्यसकट देशभरात वाहवा मिळून सृजनशील कार्याची दखल अनुकरणीय ठरते तेव्हा मात्र त्या नेतृत्वाची भरारी नेत्रदीपक ठरते. या यशासोबतच येते स्पर्धा आणि या स्पर्धेतून पुन्हा उभा राहतो अव्याहत संघर्ष.
  जनकल्याणाच्या वसा आणि वारसा जपणाऱ्या ना पंकजा मुंडे आणि खा प्रीतम मुंडेबाबत आता हेच घडत आहे. विधानसभा आणि आपल्या मंत्रालयातील खात्यांमध्ये विविध योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करत सकारात्मक विकासाची कास धरणाऱ्या ना पंकजा मुंडे आणि लोकसभेत अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी करत रखडलेल्या आणि अत्यावश्यक प्रश्नांवर लक्षवेधीतून सरकारला उपाययोजना करण्यास भाग पडणाऱ्या खा प्रीतम मुंडे यांच्या या संघर्षाच्या समर्थ वारसाला आता घरघर लागली आहे विविध आरोपांची. यात काही तथ्यहीन आरोपांनी नाहक बदनामी घडवून आणत प्रभाव कमी करण्याचा कुटील डाव विरोधकांकडून खेळला जात आहे. विरोधकांनी विरोध करताना काही आचारसंहिता असते मात्र महिला म्हणून विरोध करताना हि आचारसंहिताही पाळली गेली नाही. तथ्य असलेल्या गोष्ठीचा विरोधही स्वागतार्ह आहे मात्र तथ्यहीन विरोध विरोधकांनाच निष्प्रभ करत आहे. 

   राज्यशासनाच्या मंत्री असणाऱ्या ना पंकजा मुंडेंनी कोणत्या प्रकरणांवर बोलावे हे त्यांच्या स्थानावर अवलंबून आहे. मात्र राणा डोईफोडे सारख्या मुलींच्या छेडछाड प्रकरणात त्यांनी प्रतिक्रिया द्यायलाच हवी कारण हे प्रकरण त्यांच्या जिल्ह्यातील आहे आणि त्या महिला व बालकल्याण विकास मंत्रीही आहेत. मात्र त्यांनी आताच प्रतिक्रिया द्यावी तेही नाही. आरोप सिद्ध होतील तेव्हा त्यांना या प्रकरणातील आरोपींची दाखल घ्यावीच लागेल. त्यांच्या नावाचा वापर गुन्ह्यांसाठी होत असेल तर अशा लोकांवर कडक निर्बंध लादत त्या नक्कीच कारवाईही करतीलही.
  उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित सरकार ना पंकजा मुंडेंच्या ३ योजनांची अंमलबजावणी त्यांच्या राज्यात करण्यास उत्सुकता दाखवते. त्यातला जलयुक्त शिवार यिजनेच्या अंमलबजावणीविषयी उत्सुकता दाखवते, 'अस्मिता' योजनेतील सृजनशीलतेला नवाजते, महिला बचत गटांच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाऱ्या सुमतीताई सुकळीकर योजनेच्या अमलबजावणीबाबत उत्सुकता दाखवत महिलांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही देते. या सर्व प्रवासात ना पंकजचे नेतृत्व, योजनांची अंमलबजावणी, अभ्यासूपणा, तत्परता या राज्याबाहेरील लोकांना दिसून येते मात्र राज्यातीलच याच योजनांचे लाभधारक पंकजांना दुसने देण्यास कचरत नाहीत. आजकाल प्रसारमाध्यमानीच निष्प्रभ विरोधीपक्षांच्या हतबलतेपुढे विरोधाचे सूत्रे हाती घेतल्याने केलेल्या कामाची दाखल घेतली जात नाही, मात्र एखाद्या आपची नेता ४ कागदे हातात घेऊन माझ्याकडे ना पंकजांच्या भ्र्रष्टाचाराची पुरावे आहेत म्हंटले कि दिवसभराची ब्रेकिंग बनते. हि ब्रेकिंग का बनतेय तर आजघडीला सर्वच ठिकाणी मुत्सद्दीपणे तोंड देत आपल्या विकासाच्या कार्याचा रथ जोरात चालवणाऱ्या पंकजांना कुठेतरी आडकाठी यावी यासाठी. 

   या आणि अशाच प्रकरणातून आज बीड जिल्ह्याचे नेतृत्व तावून-सुलाखून निघत आहे. इतकी कृत्रिम नकारात्मकता बनवली जात आहे मात्र यातून सकारात्मक निकाल लागत आहेत आणि हि किमया या संघर्षमय नेतृत्वची आहे म्हणूनच आजही जिल्हा विकासाच्या दिशेने दिवसेंदिवस भक्कमपणे आपली पायाभरणी करत आहे. *आजघडीला जिल्ह्याला जे नेतृत्व लाभले आहे असे नेत्रत्व पुन्हा जिल्ह्यास लाभणार नाही. आज जर ना. पंकजाविना जिल्हा बघितला तर विरोधकांनाही काहीच किंमत राहणार नाही. बीड जिल्ह्याचा जो विकास होत आहे तो पुन्हा खुंटला जाईल. बीडचा बुलढाणा होईल आणि आपण पुन्हा मागासलेपणाचा शिक्का उजळ माथ्यावर घेऊन आपल्या कर्मास दूषणे देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकणार नाहीत*. माझे असे म्हणणे नाही कि "या नेतृत्वास आपण स्वीकारा" हा ज्याचा त्याचा प्रश्न राहिला. मात्र या नेतृत्वाची कदर आपण करायलाच हवी. बहुजन समाजातील ना पंकजा मुंडे, खा प्रीतम मुंडे , आ विनायक मेटे या सारखी नेतृत्वे जिल्ह्याच्या भरभराटीसाठी आवश्यक आहेत. जळी-स्थळी-काष्ठी विरोध करून नेतृत्वास झळाळी येते, नेतृत्वाचा असत होत नाही. 


धनंजय गुंदेकर पाटील बीड 9689043949

Sunday, 28 May 2017

अस्थिर राजकारणाची पृष्ठभूमी बीड जिल्हा ....


मागास जिल्ह्यात विकासाच्या मुद्द्याला छेद, सत्तातुरांचा उन्माद 



धनंजय गुंदेकर - बीड 9689043949

    स्थलांतरित ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्हा आता  दुष्काळ, जातीयता, आंदोलने, दंगली, राजकीय वैरदाव्यांसाठी ओळखला जाऊ  लागला आहे. राजसत्ता मिळवण्यासाठीची धडपड, त्यातही धर्मसत्ता आणि राजसत्तेचा पराकोटीचा संघर्ष, या धडपड आणि संघर्षातून सर्वसामान्यांची नजरेआड होणारी पिळवणूक आणि तिची धग तशीच राहून निरर्थक कार्यात वापरली जात आहे. गेल्या २० वर्षांपासून  राज्याचे लक्ष वाढणाऱ्या बीड जिल्ह्याचा मागास डाग धोण्याची वेळ आलेली असताना आता जिल्ह्यात विकासाचा मुद्दा बाजूला  जातीय तेढ वर डोके काढत आहे. यातू
न जिल्हयाचे वातावरण संवेदनशील बनून प्रत्येक घटना  राजकीय  पाहीतली जाते व तिला त्याप्रमाणे वाढविले आणि थोपविलेही जाते. 


  जिल्ह्यात आम्ही प्रबळ, आमची सत्ता म्हणणारा एक वर्ग आणि सत्तेतून आलेला माज उतरवण्यास सज्ज पराभूत मानसिकतेतला एक वर्ग. या दोन्हींच्या व्यतिरिक्त या जिल्ह्यात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असलेला तिसरा वर्ग हा सर्व जातीतला, निसपक्ष, निधर्मी वर्ग  ज्याला कि या दोन्हींच्या भांडणात कसलाच रस नसून हा वर्ग आपल्या रोजीरोटीसाठी आपल्या कामात व्यस्त असतो. या तिसऱ्या वर्गाला ना जात आहे ना धर्म, आपले काम हेच धर्म मानणाऱ्या या कर्मठ लोकांमध्ये या पहिल्या दोन्ही वर्गाकडून जातीयता, भेदभाव, पक्षपातपणा घुसवला जात आहे. आणि यातूनच आजच्या या आधुनिक काळात सत्तेचे केंद्र बनलेल्या बीड जिल्ह्याचे वातावरण संवेदनशील बनलेले आहे. 


  हि संवेदनशीलता जिल्ह्यातील विकासाच्या कामांना अडसर बनत आहे. या अस्थिर वातावरणाने समाजातील वातावरण कलुषित बनत असून जिल्ह्यात जातीयतेचे विष पेरले जात आहे. या विषाच्या मंथनातून थोडेच विकास साधणार आहे ? या जातीचा, त्या जातीचा यामध्ये एकमेकांसोबत लहानाचेमोठे झालेले मित्र दुरावत चालले आहेत, कट्टर समर्थनाचा भूमिकेतून नाते तुटायलेत,  संबंधितांचे संबंध या राजकीय भूमिकांमुळे कटुतेत परिवर्तित होत आहेत. या अशातून जिल्ह्यातील होतकरू तरुणाई गैरमार्गाला लागत आहे. आपला समाज, आपली जात, आपला पक्ष, आपला नेता कसा श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी दुर्दैवाने आजच्या तरुणाईचा वापर केला जात आहे.  


 जिल्ह्यातील मागासलेपणा, दुष्काळ, बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा अभाव हे विषय अजेंड्यावर नाहीत सध्याच्या तरुण पिढीपुढे, तर आपला पक्ष, नेता, जात कशी निवडणुकांमध्ये  व प्रतिस्पर्ध्याला कसे हरवता येईल यासाठी येथे टाकत लावली जाते. सृजनशीलता दाखवली जाते, बळ वापरलं जातं , वजन लावलं जातं . कितीतरी प्रश्न आहेत ज्यावर विधायक कामे केली जाऊ शकतात. जिल्हयातील सर्वच असे आहेत असे नाही, मात्र एकाची लागण दुसऱ्याला झाली तरच प्रगती होणाऱ्या या राजकीय खेळींमध्ये सर्वसामान्य भरडले जातात त्यात तरुणाई अधिक असते. 
  एका विशिष्ट पक्ष, नेत्याला विरोध किंवा समर्थन देण्यापेक्षा जनहिताचे निर्णय घेणाऱ्या आणि पक्षपाती, भेदभाव धोरणाला थारा न देणाऱ्या परिवर्तनवादी व राजकीय पद्धतींमध्ये सुधारणा घडवून आणत विकास साधणाऱ्या नेतृत्वाला साथ देत सर्वांगीण विकासाला तसेच समाधानाला प्राधान्य द्यायला हवे. 

Thursday, 25 May 2017

राजकीय आरोग्याचे युवावैद्य - डॉ प्रीतम मुंडे ते डॉ योगेश क्षीरसागर

जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेसाठी कटीबध्द, भविष्यात नेतृत्वाची संधी


सकारात्मक - धनंजय गुंदेकर 9689043949


निरामयी आणि निरागस आयुष्यात आरोग्याचे अनन्यसाधारण महत्व आहे .सामान्य जीवन सुसह्य करण्याच्या घोषणा करून सत्ता मिळवणारी एक संपूर्ण राजकीय पिढी आम्ही पाहितलेली आहे मात्र येणाऱ्या राजकीय नेत्याकडे पाहताना जनतेच्या आरोग्याकडे पाहण्याचा राजकीय कल कसा बदलला आहे ज्यातून मोठे आश्वासक अन अपेक्षित चित्र समोर येत आहे. आजच्या युवा नेत्यांनी राजकीय परीघ अधिक व्यापक करताना लोकांचे आरोग्य सांभाळायचे जे दायित्व स्वीकारले आहे ते निश्चितच अभिनंदनीय आहे. 

  'आरोग्याची दाई म्हणजे विमल ताई' असे संबोधले जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील माजी मंत्री विमल मुंदडा यांनी जिल्ह्यात आरोग्याच्या प्रश्नांना संपवत जिल्ह्याचे आरोग्य सदृढ करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या पश्चात मात्र बीड जिल्ह्याच्या वैद्यकीय सेवेत तज्ञांचा अभाव, अपुरी औषधे, सरकारी डॉक्टरांची उदासिनता, अपुऱ्या सुविधा, साहीत्याची वानवा, रुग्णांकडे दुर्लक्ष असे वातावरण होते. आपल्या या मागास जिल्ह्यात औषधउपलब्धतेसह शस्त्रक्रियाही मोजक्याच करण्यात येत होत्या. परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे. जिल्ह्याला लाभलेल्या खासदार प्रितम मुंडे व बीड भागात सक्रिय युवानेतृत्व योगेश क्षिरसागर हे पेशानी डॉक्टर आहेत. राजकारणासोबतच यांना आपल्या क्षेत्रात काम करण्याची विशेष रूची व तळमळ आहे. यातुनच सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत यांचा सतत आग्रह दिसुन येतो आहे. आज जिल्ह्यात आरोग्यविषयक उपक्रमांतर्गत विविध आजारांना आळा बसत आहे यात खा. डॉ प्रितम मुंडे यांचा सहभाग बराच आहे. तर बीड तालुक्यात डॉ योगेश क्षिरसागर यांनी आपल्या वैद्यकीय सेवेत सामाजिकतेचे भान राखत मोफत उपचारासह काकु-नाना प्रतिष्ठान आयोजित आरोग्य शिबीरात राज्यभरातील प्रमुख तज्ञ डॉक्टरांना तपासणी, उपचारासाठी पाचारणही केले होते. त्यांनी आयोजित केलेल्या बीड येथील आरोग्य शिबीरास भरभरून प्रतिसाद मिळाला.
  खा. प्रीतम मुंडे यांनी जुलै-ऑगस्टच्या दरम्यान जागेअभावी २०० खाटांच्या बीड जिल्हा रुग्णालयात ५०० खाटांची मंजुरी असतानाही विषय प्रलंबित पडला होता. यात त्यांनी विशेष लक्ष घालत गृह विभागाची जागा उपलब्ध करून घेण्यात यश मिळवले. यासोबतच अंबाजोगाई येथे आयुर्वेदिक महाविद्यालय सुरु करावी म्हणून मुख्यमंत्र्यांना "डॉक्टरी" पाठपुरावा केला यात त्यांनी त्यांचा हिरवा कंदीलही मिळवला आहे. यासोबतच त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील पहिले "वेलनेस क्लिनिक" अंबेजोगाई येथे सुरु करण्यात आले आहे. दिनांक २३ ते २७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय विभाग यांच्या सयुंक्त विद्यमानातून आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभ जिल्ह्यातील हरेक रुग्णापर्यंत पोहोचला त्यात खा. प्रीतम मुंडे यांच्या नियोजनाचा उत्कृष्ठ सहभाग होता. खा प्रीतम मुंडे जिल्ह्यातील सर्वसामान्यांना जडलेल्या दुर्धर आजाराच्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी, जे जे हॉस्पिटलमधील उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असतात हे विशेष. आता चालू असलेल्या दीनदयाल उपाध्याय आरोग्य शिबिरात खा प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्याला यात सहभागी करून जिल्ह्यातील आरोग्य समस्यांना लगाम कसण्याचा काम केले आहे. कालच्या गुरुवारपर्यंत ६१ हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी या अभियानात नोंदणी केली आहे. यात उत्तरोउत्तर वाढच होत जाणार आहे. यातील कित्येक रुग्णांना चांगल्या तज्ञांकडून उपचार मिळण्याची सुविधा आहे.
   खा प्रीतमताईंप्रमाणेच बीड भागातही जिल्ह्यातील उत्कृष्ठ युरोसर्जन असणारे डॉ योगेश क्षीरसागर हेही आपल्या क्षेत्रातील उत्कृष्ठतेसोबतच समाजकारण-राजकारणही प्रभावीपणे साधताना दिसून येत आहेत. डॉ योगेश क्षीरसागर यांची ओळख हि शांत, संयमी, अभ्यासू, विकासासाठी पोटतिडकीने कार्ये करणारे युवा नेतृत्व म्हणून आहे. गेल्या महिन्यातील काकू-नाना प्रतिष्ठान आयोजित आरोग्य शिबीर, योग शिबिरांचे आयोजन, गोरगरिबांसाठी मोफत  शस्त्रक्रिया इत्यादींचे आयोजन त्यांनीही केले आहे. येणाऱ्या योग दिनी त्यांनी बीडवासीयांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्याची तयारीही सुरु केली आहे. आतापर्यंत २५ पेक्षा जास्त अवघड शस्त्रक्रिया, त्याही मोफत करणाऱ्या डॉ क्षीरसागरांना राजकीय काटशह चांगल्या प्रकारे जमत असून आपल्या पेशाप्रमाणेच ते अवघड राजकीय दबावाचीही चांगली शस्त्रक्रिया करतात असे बोलले जाते. 
   राजकीय चालीरीतींसोबतच आपल्या पेशातही कर्तबगारी असणे हे नगण्यच मानले जाते. या पेशाचा उपयोग समाजकारणासाठी करतच राजकारणातील यशाचा शिवधनुष्य उत्कृष्ठरित्या पेलणे हा अजोड सुयोग्य या राजवैद्यांना पुरेपूर जमला आहे. आज स्व. विमल मुंदडांच्या आरोग्य विषयक कार्याप्रमाणेच जिल्ह्याच्या राजकारणात या वैद्यांची कार्ये सर्वांना आरोग्य यासाठी हक्कासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येत.विविध समस्यांचा-प्रश्नांचा गाढा अभ्यास, त्या प्रश्नाची अभ्यासू मांडणी, उपाययोजनांसाठी सततचा पाठपुरावा, मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करण्याची तयारी या सर्व जमेच्या नेतृत्वगुणांमुळे येणाऱ्या काळात खा प्रीतम मुंडेंना त्यांच्या कार्याची पावती म्हणून केंद्रात नेतृत्वाची संधीही मिळू शकते. हे शक्यतेतील आडाखे सत्याही उतरण्याचे संकेत आता मिळू लागले आहेतच. त्यांच्यासोबतच बीडच्या राजकारणातील राजवैद्यांनाही आपल्या सेवेतून जनसामान्यांचे प्रेम मिळण्यास वाव आहे.

Wednesday, 17 May 2017

..... तर धनजंय मुंडेंना परळी विधानसभा विजय हे मृगजळ ठरेल




लोकनेत्याचा वारसा आजही लोकविश्वासास पात्र 


धनंजय गुंदेकर बीड 9689043949


 एका तालुक्यापुरती चर्चेत असणारी निवडणूक सत्तास्पर्धेत प्रतिष्ठेची बनवली जाते. तुल्यबळ दिसणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये साम-दाम-दंड-भेद या नीतींचा वापर होतो. फिरवा-फिरवी होते.मतदारांना वाटावाटी होते. निकालानंतर पराभूत स्पर्धकास थेट राज्याच्या निवडणुकीत पराभूत केल्याच्या मानसिकतेत दाखवलं जाते. परळीच्या बाजार समितीच्या निवडणुकांतील मुंडे भगिनींचा पराभव राज्यभरात गाजवला गेला. विरोधी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा हा विजय आणि यातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयाचे अंदाजही वर्तवायला तज्ज्ञांनी सुरुवातही केली. माध्यमे, सोशल मीडियातील काही उथळ राजकीय विश्लेषकांनी पंकजा मुंडे यांना फुकटात सल्ला वाटपाची खैरातच सुरु केली आहे. याउलट धनंजय मुंडे यांच्या प्रशंसेचे पूलही बांधण्यात आले. एकूणच आजघडीला येणाऱ्या विधानसभेबाबत अंदाज बांधणे संपूर्णपणे अतार्किक ठरते. 
  १९९२ पासून स्व गोपीनाथ मुंडेंचे विशेष लक्ष असलेल्या परळीला मराठवाड्याची बारामती समजले जाते. या तालुक्याला या लोकनेत्याने विकासाची गंगाच वाहिली. अशा या लोकनेत्याच्या पश्चात आजही नामदार पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे हा वारसा समर्थपणे चालवत आहेत. राजकारणातील परिवर्तनासंबंधी आग्रही असणाऱ्या या भगिनींना सुरुवातीच्या काळात संघर्षाचा सामनाही करावा लागत असला तरी निवडणुकांच्या ऍक्ट आणि टॅक्ट बाबत बोलताना मुंडे भगिनींना ऍक्टबाबत बोलत धनंजय मुंडेंच्या टॅक्ट शिकण्याचा सल्लाही त्यांना दिला जातो. तटस्थेतेतून जेव्हा आपण राजकीय भूमिकेचे विश्लेषण करण्यात येते तेव्हा मुंडे भगिनींची राजकीय पॉलिसी हि राजकीय परिवर्तनाची आहे. राजकारणातील क्षुल्लक कामांना डावलण्याचे, महत्वपूर्ण नसलेल्या बैठकांना टाळणे, संपर्कात नसने या जरी चुका त्यांच्याकडून होत असल्या तरी त्या त्यांच्या एकूण येणाऱ्या धोरणांच्या अमलबजावणीतून आपोआपच गढून येतात. भाजप हा घराणेशाहीला डावलणारा पक्ष आहे. या पक्षात जो काम करतो, त्यांच्या उद्दिष्ठांची परिपूर्ती अव्याहतपणे करतो तीच व्यक्ती नेतृत्वस्थानी जाते. म्हणूनच राजकीय वारस्यासोबतच पक्षातील विचारधारेशी सुसंगत कार्यपद्धतीत अवलंबणे या पक्षात गरजेचे आहे. 


  राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या टॅक्टनी चार निवडणुकांमध्ये निवडणुकांमध्ये गुलाल उधळून मुंडे भगिनींच्या माथी बुक्का लावल्याची चर्चा होत असली तरी मात्र मुंडेंनी जिंकलेली  वैदयनाथ बँक व साखर कारखाना निवडणूका मापातून वगळता येणार नाहीत. विधानसभेच्या ओसरीवर धनंजय मुंडेंचा ठोकलेला तंबू प्रभावी दिसत असला तरी जनमानसाची भावना मात्र आजही साहेबांवर आहे.जलयुक्त, परळी औष्णिक विद्युत केंद्र संचनिर्मिती, परळी रेल्वे प्रश्न, महिला सक्षमीकरण, आरोग्यसेवा यातील मुंडे भगिनींचे कामे मतदार थोडेच विसरणार आहेत? मुळात एकट्या परळी विधासभेच्या हार या जित ने राज्याच्या राजकारणावर किती फरक पडणार हा अभ्यासाचा विषय ठरेल मात्र आजही लोकसभेत खासदार प्रीतम मुंडे यांच्या तोडीचा उमेदवार जिल्ह्यात नाही. पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात जो निधी खर्च केला आहे त्याचा लाभ येणाऱ्या वर्षात तेथील मतदारांना दिसून येईल तेव्हा मात्र जिवाभावाचा समजरे जाणारे धनंजय मुंडे हे तेथील मतदारांसाठी दुय्यमही ठरू शकतात हि शक्यता नाकारता येत नाही. 

  आपल्याला कोणाची किती प्रगती होत आहे व कोणाची किती प्रगती होईल हे समजावण्यासाठी कासव आणि सशाचे उदाहरण दिले जाते. एक निरपेक्ष राजकीय विश्लेषण करताना धनंजय मुंडेंचा वेग आज त्या गोष्ठीमधील सशाच्या वेगासारखा दिसून येत आहे, तर मुंडे भगिनी कासवाच्या गतीने परळीमध्ये आपला प्रभाव राखून आहेत.
मात्र यात मुंडे भगिनींची गती जरी संथ असली तरी ती टिकाऊ आहे आणि तिला संघर्षाचा वारसाही आहे. लोकविकासाचा अखंड झरा असणाऱ्या स्व मुंडे साहेबांचे कर्तृत्वाचा विसर परळीकरांना पडेल असे होणे अवघड आहे. वादळी,  धाडसी व्यक्तिमत्व समजले जाणारे धनंजय मुंडे आणि संयम, कार्यशैलीबाबत ओळख असणारया मुंडे भगिनी यांचा जेव्हा सामना होईल तेव्हा मुंडे भगिनींकडे शास्वत प्रभावाची यंत्रणा असेल तर धनंजय मुंडेंकडे करिश्माइ कर्तृत्वाची फळी. करिश्मा हा कधीनाकधी उतरतो तेव्हा शास्वत प्रभावी नेतृत्व विजयाला गवसणी घालते. 

  एकूणच आज जरी धनंजय मुंडेंसाठी "फील गुड" वातावरण दिसत असले तरी हे मृगजळाच्या लहरींचे संकेत आहेत. मुंडे भगिनींनी वेळ न देणे, कार्यर्त्यांचा संपर्कातील अभाव या एवढ्याशा गोष्टी या भगिनींसाठी कष्टाच्या नाहीत. त्यांनी त्यांच्या धोरणात जर या गोष्टींसाठी वेळ दिला तर जनमत केव्हाही बदलू शकते, सोबतच केलेले विकासकामे, समाजाशी बांधिलकी, लोकांची आजही असलेली भावना यांमधून परिवर्तन घडू शकते. धनंजय मुडेंनी यात वाहवत जाण्याने हातचे पण जाण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर येऊ शकते.

Monday, 15 May 2017

गल्ली ते दिल्ली काळजी वाहणाऱ्या खासदार


आरोग्य-स्वछता, रेल्वे, कृषी, कामगार विषयात विकासाशी कटिबद्ध लोकप्रतिनिधी- खा. प्रीतम मुंडे


3 जून या तारखेला बीड जिल्ह्याच्या इतिहासात काळा दिवस म्हणून पाहितले जाते. याच दिवशी जिल्ह्याची भरली ओटी पालथी झाली अन नियतीने आमचा लोकनेता हिरावला. अनेक अधुरे कामे अन स्वप्न सोडून नियतीने आमचा लोकवारस जेव्हा गेला तेव्हा तो वारसा नियतीने दोन बहिणीच्या खांद्यावर टाकला. भारतातील सर्वाधिक मताधिक्याने येणाचा बहुमान आज प्रीतम मुंडे यांच्याकडे आहे तो एक प्रकारे जनतेचा असणारा विश्वास आहे. जिल्ह्यातील रेल्वे कामाला मिळालेली गती , पंतप्रधान सडक योजनेतून जिल्हा रास्तेमय झाला आहे याचे श्रेय प्रीतम मुंडे यांच्या पाठपुराव्याला द्यावे लागेल. मराठी अभिजात दर्जा देण्यासाठी अन जिल्ह्याचे अनेक प्रश्न संसदेत मांडले आहेत. जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यापासून ते पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत "पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेपर्यंत जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येक बाबीची दाखल खासदार प्रीतम मुंडे घेताना दिसून येत आहेत.

   अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान नगर-बीड-परळी रेल्वेच इंजिन २१ मार्च रोजी पहिल्यांदाच परिक्षणा साठी धावलं. बीडकरांच्या स्वप्नपूर्तीचे पहिले पाऊल ठरत खासदार मुंडेंच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे जिल्ह्याला दिसून येऊ लागले. या दिवसानंतर जिल्ह्यातील लोकांना खासदार प्रीतम मुंडेंच्या कार्यपद्धतीची अवाढव्यता आणि संघर्षातून मिळवलेले विकासाचे राजकारण कळले. 


मोसमी पावसावर आधारित शेती असलेल्या बीड जिल्ह्यात ऐनवेळी पिकाला गरज असलेल्या खतांचा तुटवडा निर्माण होतो. काही खत- बी-बियाणे विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण ठेवत खत खरेदीत पारदर्शकता यावी म्हणून खासदारांनी विशेष लक्ष घालत एप्रिल महिन्यातच पीओएस मशीनचे वाटप करण्यात आले. 

   मागास जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांना आरोग्यविषयक समस्यांचा आर्थिक भार असह्य होतो. या आर्थिक भाराची परवड कमी करण्यासाठी सर्वांगीण विकासाशी बांधिलकी असणाऱ्या खासदार मुंडे याकडे विशेष लक्ष देऊन असतात. जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या महाआरोग्य शिबिरानंतर जिल्हा रुग्णालय बीड तसेच स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व हॉस्पिटलच्या विकासासाठी व तेथील सेवांच्या उपलब्धतेसाठी महाराष्ट्रातील पहिले "वेलनेस क्लिनिक" खासदारांच्या पुढाकारातून सुरु करण्यात आले. १ मे ते २७ मे दरम्यान पथदर्शी आरोग्य तपासणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यात यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून जिल्ह्यातील आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न खासदारांच्या पुढाकारातून करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़च्या खासदारांच्या टीममध्ये खासदार प्रीतम मुंडे आघाडीवर आहेत. स्वछतागृहांसाठी देण्यात येणारे १२ हजार रुपये कमी पडतात. यासाठी नवीन तंत्रज्ञानातून कमी खर्चात तयार होणारे स्वच्छतागृहे बनवण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा यासाठी लोकसभेत खासदारांनी सवाल उपस्थित करत केंद्र शासनाला याबाबत विचार करण्यास भाग पाडले. 
  ओबीसी स्वतंत्र मंत्रालय स्थापना करणे हे स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते. यासाठी लोकसभेत खासदार मुंडेंनी पाठपुरावा केला होता.  बेघर व निराश्रित मुलांच्या पालन पोषणासाठी निवडलेल्या सेवाभावी संस्थाच शोषणास जबाबदार असतात हे संसदेत ठणकावत 'यासाठी केंद्र सरकार या गोष्टींना आळा घालण्यासाठी काही ठोस पावले उचलणार आहे का ? असा प्रश्न केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती मनेका गांधी यांना विचारून लोकप्रतिनिधींनीही अशा संस्थांवर लक्ष ठेवणे गरजेचे असते हे खासदार मुंडेंनी दाखवून दिले.

  मार्च महिन्यात संसदेत महिला प्रसूती सुविधा बील मंजुरीसाठी आले असता त्यासंदर्भात काही मुद्दे खासदार मुंडेंनी मांडले यामध्ये मातृत्व रजेचा लाभ ऊसतोडनी कामगारांसोबत असंघटीत क्षेत्रातील महीलांनाही मिळावा.स्तनपानासाठी महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर देशभरात हिरकणी कक्ष स्थापीत करावेत.महीलांना गरोदरपणाच्या हक्कांबद्दल जागृती करण्याची जबाबदारी रुग्णालयांनी घ्यावी.पित्यांनाही पितृत्व रजा देण्याचा विचार व्हावा.खाजगी क्षेत्रातील स्त्रीयांना मातृत्व रजेच्या काळात आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा.गरोदर महीलांना पोटापाण्यासाठी पोटातील मुलांच्या आरोग्याची हेळसांड करण्याची वेळ येवु न देणे ही सरकारचीही जबाबदारी आहे. अशा या ऊसतोड आणि मजुरांच्या मागण्यांसंदर्भात लक्ष वेधणाऱ्या खासदारांनी मुंडेसाहेबांचा समर्थ वारसा आपल्या कार्यपद्धतीतून दाखवून देण्याचे काम अखंडितपणे सुरु ठेवलेले आहे.२ कोटी लोकसंख्येच्या मराठवाड्यातील उद्योग, व्यवसाय, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या लोकांना पासपोर्ट सुविधा येथेच उपलब्ध व्हावी म्हणून लोकसभेत पासपोर्ट कार्यलयासंबंधी पाठपुरावा खासदार मुंडेंनी केल्याने त्याची मंजुरी मिळत औरंगाबाद व बीड येथे हे कार्यालय लवकरच सुरु होणार आहेत.


  लोकप्रतिनिधींच्या चांगल्या कामांबाबत सकारात्मकता असायला हवी. चुकांवर बोट ठेवण्याबरोबरच केलेल्या चांगल्या कामाचीही शाबासकी किंवा प्रशं
शा व्हायला हवी. जिल्ह्याच्या दुर्लक्षित परंतु गरजेच्या प्रश्नाकडे खासदार मुंडे यांचे विशेष लक्ष असते याकडे सकारात्मकतेतून पाहणे गरजेचे आहे. राजकारणबाह्य सुसंवादासह कार्यकर्त्यांशी आपुलकी, संपर्क, जनसामान्यांच्या प्रश्नाची जाण व विकासासाठीची कटिबध्दतता त्यांना जिल्ह्यात उत्तरोउत्तर लोकप्रिय बनवत आहे. 


Wednesday, 10 May 2017

बीड जिल्ह्याच्या राजकीय परिघात नेतृत्वबदलाचे वारे

राष्ट्रवादी आघाडी'वर तर भाजप, सेना, 
संग्राम, काँग्रेस सुस्तावलेलेच



         
राजकीय घडामोडींमध्ये आकर्षित करणाऱ्या बीड जिल्ह्यातील राजकीय वारे आणि राजकीय वावटळी कधीच थंडावत नाहीत याचा प्रत्यय राज्याला वारंवार येतच असतो. विधानसभेनंतर जिल्ह्यातल्या मुख्य पक्षांमधील पक्षनेतृत्वांच्या खांदापालटीनंतर जिल्हापरिषद, पंचायत समिती, बाजारसमित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा पक्षश्रेष्ठींनी घेतलेलाच असेल. या निवडणुकांमध्ये  राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षांची जिल्ह्यात सरशी होती. मात्र राष्ट्रवादी पक्षाला जास्त  मिळूनही त्या पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही ? जिल्ह्यातील नेतृत्व राज्यस्तरावर नेतृत्व करत असतानाही बहुमताने सत्ता भाजपाला मिळवता का नाही आली? राज्याच्या सत्तेत सहभागी शिवसेनेला गेवराई सोडता इतरत्र जी.प. चा एकही सदस्य निवडून आणता का नाही आला? जिल्ह्यातील या सर्व राजकीय गणिताचे तात्पर्य हे पक्षाच्या नेतृत्वबदलामध्ये दिऊन येते.
-----------------------------------------------------------------------------------
----------धनंजय गुंदेकर - बीड 9689043949------------
---------------------------------------------------------------

  जिल्ह्यात सध्या ५ विधानसभांवर भाजपची सत्ता आहे तर राष्ट्रवादीच्या ताब्यात बीड विधानसभा आहे. जीपच्या निवडणुकांपूर्वी यावेळी जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात जाईल असा अंदाज बांधला जात होता. मात्र सत्ताधारी भाजपाला बाजूला सारत मतदारांनी राष्ट्रवादीच्या बाजूने झुकतं माप दिले. बहुमताच्या संख्याबळाच्या गणितात बंडखोरी आडवी आल्याने राष्ट्रवादीच्या तोंडचा घास भाजपने सेना, संग्राम, काँग्रेस, अन धसांच्या मदतीने हिरावून घेतला. या राजकीय घडामोडींमध्ये या एकूण निकालाचे विश्लेषण या पक्षांच्या अजेंड्यावर नव्हते मात्र बीड जिल्हा परिषदेच्या निवडीनंतर याची उलटतपासणी सुरु झाली. पाहिल्यान्दा राष्ट्रवादीतील नेतृत्वाचे वाद चव्हाट्यावर आले. यातून पक्षाच्या विधानसभावाइज अलिखित कराराला मोडीत काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. धनंजय मुंडेंच्या बीड अन आष्टी-पाटोद्यातील एकदोन निर्णयावरून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीतील युवा नेतृत्वांना दिलेल्या संधीने जिल्ह्यातील पक्षाकडे आकर्षित होत आहे. राष्ट्रवादीत पक्षाचे हित बघितले जात असल्याचे दाखवून देण्याचा यातून प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. 


       याउलट जिल्ह्यातील भाजपच्या जिप निवडणुकीतील एकूण परफॉर्मन्सवर सत्ताप्राप्तीच्या झालरीने पांघरून टाकले असले तरी मात्र भाजपाला आपल्या नेतृत्वात बदल करणे गरजेचे असल्याचे भाजपच्या समर्थकांमधून परिवर्तनाचे सूर निघत आहेत.  भाजपाकडे आकर्षित होत असलेल्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची कदर या पक्षात होत नसल्याने पक्षनेतृत्वातील पदाधिकाऱ्यांवर स्पष्ठपणे नाराजी व्यक्त करण्याचे सत्र सुरु आहे. ना पंकजा मुंडेंचे नेतृत्व व मुंडे साहेबांवरची निष्ठाच अजूनही कार्यकर्त्यांना आणि मतदारांना भाजपशी बांधून ठेऊन आहे. मात्र मतदार व नेतृत्व यांची नाळ जोडून दुवा साधणाऱ्या पदाधिकाऱयांचे परिवर्तन गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. 
  जिल्ह्यात एकेकाळी ४ विधासभांवरुन निवडणूक लढणारी शिवसेना आता बीड विधासभेपुरती सीमित झालेली आहे यातही परळीच्या भाजपचे आणि बीडच्या राष्ट्रवादीचे सख्य सर्वश्रुत असल्याने येथे शिवसेनेला स्वतःच्याच बळावर लढावे लागत असे. अश्यातच गेवराईतून बदामराव पंडितांनी सेनेचे शिवबंधन स्वीकारल्याने बीड जिल्हा परिषदेच्या आखाड्यात शिवसेनेला ४ जागा मिळवता आल्या. परंतु बालेकिल्ला असणाऱ्या बीड विधानसभेत शिवसेनेची विकेट शून्यावरच पडली. शिवसेना गेल्या १० ते १२ वर्षांपासून एकच पक्षनेतृत्व सांभाळून आहे. जिल्ह्यातील शिवसेना कोमात आणि इतर ठिकाणी जोमात म्हणण्याची वेळ येथील शिवसैनिकांवर आलेली आहे. शिवसेनेची पत आज जरी गेवराईतून राखली गेली असली तरी ती पत बदामराव पंडितांच्या वयक्तिक मतांतून होती. बाकी जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी, दोन्ही जिल्हाध्यक्ष काय करतात? हा प्रश्न आता शिवसैनिकांकडूनच उपस्थित केला जात आहे. 


 जिल्ह्यातील राष्ट्रीय नेतृत्व तथा भासंपचे विनायक मेटे यांच्या पक्षाने ४ जागा मिळवत आपले अस्तित्व सिद्ध केले मात्र निवडून आलेले जिप सदस्य व्यक्तिगतरीत्या मतदारांशी चांगले संभंध ठेऊन होते त्यामुळे त्यांचा विजय झाला अशीही चर्चा आहे. आ मेटेंची बीड विधासभेसाठी तयारी सुरु आहे मात्र येथील २  ते ३ सर्कलमध्ये त्यांना १ हजार मतांचा आकडाही पार करता आला नाही. शिवाय मेटे, मस्के  या नावांशिवाय या पक्षात इतरांच्या मताची किंमतही धरली जात नसल्याने पक्षातील नेतृत्वाबद्दलासोबतच अधिकारप्राप्तीबाबतही कार्यकर्ते अपेक्षित आहेत. 


 बीड जिल्हा परिषदेच्या सभापतींमध्ये एक पद काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे सदस्य अत्यंत नगण्य असतानाही काँग्रेसचे सदस्य म्हणून त्यांना सभापतीपद मिळाले. देशात भाजपकडून काँग्रेसमुक्त भारताचे नियोजन चालू असताना मात्र जिल्ह्यात भाजपनियुक्त काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. जिल्ह्यात काँग्रेसची कमालीची वाताहत झालेली असताना काँग्रेस पक्ष अंबाजोगाई आणि केज या भागातच केंद्रित झालेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील निष्ठवंत काँग्रेसजनांना नेतृत्वातील बदल आवश्यक वाटत आहे मात्र गेल्या कित्येक निवडणूक आल्या आणि गेल्या काँग्रेस मात्र आहे तेथेच आहे.  
 एकूणच राष्ट्रवादीने धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, महेंद्र गर्जे, बजरंग सोनवणे यांसारख्या नेतृत्वांना संधी देत पक्षात नवीन हुंकार भरला  आहे. सत्ताधारी महायुतीतील पक्षांमध्ये सुस्तावलेपणा दिसून येत आहे. परिवर्तन हा आवश्यक नियम आहे हे समजून घ्यायला सत्ताधार्यांना बराच वेळ लागेल तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेलं असेल.  

Monday, 8 May 2017

काँग्रेस, स्थानिक पक्षांना कमकुवत बनवून भाजपा एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात



भाजपाबरोबरच स्थानिक पक्षांच्या आहोटीस अस्मिता अन काँग्रेसमुक्त भारतास काँग्रेसजन ठरताहेत जबाबदार 


  काँग्रेसच्या राजवटीला सुरुंग लावत २०१४ च्या लोकसभेत एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजप पक्ष सध्या देशात एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील वातावरणही आरएसएस आणि काँग्रेसजनांच्या उदासीन राजकीय धोरणामुळे त्यांना पोषक बनतही आहे. कालपरवा भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ६०० पेक्षा जास्त स्वयंसेवक येणाऱ्या निवडणुकांसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पाठविले आहेत. आरएसएस आणि भाजपा आपला अजेन्डा आणि अभियान उघड राबवत असते त्याचवेळेस ते त्यापेक्षा जास्त अंधारातूनही राबवत असते. आज जरी ६०० स्वयंसेवक राजकीय विश्लेषण व अंमलबजावणीसाठी पाठविल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी ते त्यापेक्षा शेकडो पटींनी अधिक असू शकतात. देशातील काही राज्यांमध्ये कमळाचा मागमूसही नसताना त्या राज्यात आता भाजप स्थिरस्थावर होत आहे. ईशान्येची राज्ये, प बंगाल, तमिळनाडू, पंजाब सारख्या राज्यांमध्ये भाजपा पहिल्यापेक्षा जास्त प्रबळ बनली आहे.
  युती, आघाडी करत सत्तेत भागीदार होणारा भाजप पक्ष आता थेट त्या त्या राज्यात स्वबळावर लढत सत्ता मिळवत आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या राज्यात उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत होते त्या राज्यांमध्ये भाजपचे उमेदवार एक तर निवडून येत आहेत किंवा ते दुसऱ्या स्थानी असतात. भाजपने महाराष्ट्रात शिवसेना, काश्मिरात पीडीपी यांच्यासोबत अपरिहार्यता म्हणून युती ठेवली आहे मात्र पंजाब, गोवा व इतर राज्यांमधील युतीला त्यांनी टाळत एकहाती सत्तेसाठी प्रयत्न केलेले आहेत. पूर्ण बहुमताने भाजप शासित राज्यांमध्ये भाजपाकडून त्यांच्या विचारसरणीनुसार शासन चालविले जात आहे. भाजपा लहान राज्यांचे समर्थन करते, शहरीकरणावर या पक्षाचा भर आहे व याच नीतीवर आज केंद्र व राज्य शासन चालविले जात असून शेतकऱ्यांना उपाशी मारण्याचे कर्तबही भाजपच्या धोरणातूनच उगलेले आहेत.
   अचंबाची घटना म्हणजे भाजपच्या उच्च वर्णिय नेतृत्वांचा स्वीकार देशभरातील सर्वच थरातून केला जात आहे. आजघडीला केंद्रीय तसेच राज्यातील मंत्रिमंडळात उच्चवर्णीय अधिक असतानाही कसलीही कानकून केली जात नाही. काँग्रेसच्या राजवटीचा लोकांना सरळसरळ विसरच पडलेला आहे. मीडियातून काँग्रेसच्या चुकांवर कचकाटून रगडण्यात आल्याने सामान्यांना काँग्रेस खलनायकच्या भूमिकेत दिसून येत आहे. मणिपूर, गोवा या राज्यात काँग्रेस चांगले संख्याबळ घेऊनही विजयी होऊ शकली नाही याचे कारण राहुल गांधींची निष्क्रियता हे दाखवण्यात आले असले तरी यावेळी काँग्रेसची तज्ञ मंडळी कुठे गेली होती? कपिल सिब्बल, जयराम रमेश यासारखी कित्येक नावे सध्या चर्चेच्या बाहेर आहेत ते असे का करत आहेत? राहुल गांधींकडे बोट दाखवत सर्व आपली पापांना झाकून ठेवण्याचे काम करत आहेत. काँग्रेसची पकड जी काही ढिली होत आहे त्यासाठी आजघडीला काँग्रेसजनच जबाबदार आहेत.
   काँग्रेबरोबरच अस्मितेच्या राजकारणावर आजपर्यंत अबाधित राहिलेल्या स्थानिक पक्षांना आता भाजपच्या राष्ट्रवादाच्या आव्हानाने दुय्यम स्थानावर फेकलेले आहे. एका राज्यापुरते सीमित असणे, मोठमोठे प्रकल्प केंद्राच्या मेहरबानीवर अवलंबून असणे, केंद्रात भाजपचे सरकार असल्याने बिगरभाजपशासित राज्यांना डावलण्याचा प्रकार अधिक होतो यातून आपल्या दारात येऊन मतदान मागण्याची आणि विकासाची हमी देणाऱ्या भाजपाकडे मतदारांचा कौल आपोआपच सरकतो. आजघडीला छुपा हिंदुत्ववाद वाढविणाऱ्या भाजपाकडे उघडपणे सर्वधर्मसमभाव जपला जात आहे. यातूनच स्थानिक पक्षांपेक्षा एकच पक्ष, एकच झेंडा अन केंद्र आणि राज्य आपले याच धोरणातुन देशभरात भाजपला पसंती आणि स्थानिक पक्षांना दुय्यम स्थान दिले जात आहे. यातूनच देशभरातील लोकसभा निवडणुकांवेळी विधानसभा निवडणुकांही घेण्याचा विचार पंतप्रधानांच्या विचाराधीन आहे.
   देशभरातील स्थानिक पक्षांचे प्रभावी नेते आता चर्चेच्या एक तर बाहेर आहेत किंवा त्यांच्यावर त्यांचा प्रभाव कमी करणारे आरोप लावले जात आहेत. यातून स्थानिक पक्षांच्या प्रभावही खिळखिळा करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहेच. भाजपच्या अजेंड्याला प्रभावीपणे राबविण्यास सिंहाचा वाटा  असणाऱ्या  आरएसएसचे कित्येक छुपे स्वयंसेवक आता इतर पक्षांच्या मुख्य कमिटीतही प्लांट केले गेले आहेत. काँग्रेसपासून ते आताच्या नव्या दमाच्या आप पक्षांपर्यंत आरएसएसचे लागेबंध असणारे कित्येक स्वयंसेवक शिस्तीत भाजपासाठी काम करत आहेत. यातूनच काँग्रेसच्या कमकुवत होण्याने आणि स्थानिक पक्षच्या आहोटीने देशात भाजपाला एकहाती सर्वच थरात सत्ता मिळवण्याचे कुरण तयार होत आहे. येणारी लोकसभा हि पण भाजपाचीच असेल असे भाकीत वर्तवणारांना सत्य आहे असे वाटत असले तरी अजूनही काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांसाठी वेळ गेलेली नाही परंतु हा भाजपचा विजयाचा उधळलेला वारू थोपवणे एवढेही आता सोपे राहिले नाही..... 

धनंजय गुंदेकर, बीड

Friday, 5 May 2017

मेटेंना द्राक्षे आंबट ........


शिवस्मारक उदघाटनावेळी अध्यक्ष असणाऱ्या मेटेंना डावलण्यात आले होते.
 त्यावेळीच त्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. 


एखादी इच्छित गोष्ट जेव्हा मिळत नसल्याचे लक्ष्यात येते अन मिळून जरी आली तरी तिची लाभ मनसोक्त लाभ घेण्याची आपलीच कमाल मर्यादा संपत आली असेल तर मग त्या मिळालेल्या गोष्टीचे मूल्य असून देखील किती असते हे बहुदा आ विनायक मेटे यांना उमजले असावे अन त्यातून त्यांनी मंत्रीपदाची लालसा सोडून दिल्याची कालपरवा घोषणा केली . या घोषणेमागे जिल्ह्यातील राजकीय प्रस्थवाढही असू शकते. शिवाय बीड जिल्ह्यातील सत्तेच्या सहभागाचे गणित जुळवायच्या उद्देशातूनही हि चाल खेळली गेली असेल.

 आ विनायक मेटे यांनी गेली दहा वर्षे देव पाण्यात घातले असतील ते फक्त लाल दिव्यासाठी. मेटेंना मिळणाऱ्या लाल दिव्याच्या प्रतीक्षेत लाल दिव्यावरच बंदी आली आणि सोबतच मेटेंनाही आता लाल दिवा नकोसा झाला आहे. या हवेसे वाटणाऱ्या आणि उराशी स्वप्न बाळगलेल्या मंत्रिपदसाठी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे गरजेचे आहे तो विस्तार जवळपास ६ महिने लांबणीवर आहे. यातून मंत्रिपद मिळालेच तर दस्तरखुद्द मेटेंनीच सांगितले कि आपल्याला कार्यपद्धती समजण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागेल. म्हणजेच मेटेंना त्यांचे मित्र मुख्यमंत्रीमहोदयांनी मंत्रिपद देतो म्हणत आणि जिल्ह्यातूनच अडकवत युतीतही नुसतं झुलवत ठेवण्यात आले असे दिसून येते. 
  ''मेटे जिकडे सत्ता तिकडे'' असे समीकरण गेल्या निवडणुकांमधून दिसून येत असले तरी मेटेंना जाणीवपूर्वक मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेले आहे. मुख्यमंत्रीमहोदयांनी याची शिताफीने सारवासारव करत मेटेंना शिवस्मारकाच्या अध्यक्षपद देण्यात आल्याचे सांगत ते एखाद्या मंत्रिपदासारखे आहे असे जाहीर केले. मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या मेटेंना आधी आघाडीकडून आणि आता युतीकडूनही मंत्रिपदासाठी डावललल्याचे दिसून येत आहे. शिवस्मारक समिती अध्यक्षपद, विधानसभा आणि विधानपरिषदेतील प्रत्येकी १-१ सदस्यत्व, बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि पंचायत समितीतील सभापतिपद असलेल्या मेटेंना आता जिल्ह्यातील सत्ता बळकट करत आपला राजकीय दबदबा वाढवायचाहि असू शकतो. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता भाजपाकडे आकर्षित राहणार असल्याचे दिसून येत असल्यानेच अल्टिमेटम, डेडलाईन, त्यात मुदतवाढ करूनही मंत्रिपद न मिळालेल्या नाराज मेटेंनी सत्तेला लाथाडी न मारता समजूतदारपणाची भूमिका घेत मंत्रिपदाच्या शर्यतीत हिस्साच न घेण्याचे जाहीर केले आहे. 
    जिल्ह्यातच त्यांना मतांच्या ध्रुवीकरणासाठी स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी सोबत घेतले होते. यानंतर त्यांनी इतरही रिपाई, स्वा.शे.स., रासप या पक्षांची मोट बांधण्यात स्व. गोपीनाथ मुंडेंना मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यापश्चात मात्र मेटेंना येथील ओबीसी नेत्यांशी मंत्रिपदासाठी संघर्ष करावा लागला. तिकडे रिपाई केंद्रात गेले, स्वाभिमानी - रासपला राज्यात मंत्रिपद मिळाले मात्र मेटे आमदारचे नामदार न राहताच राहिले. मात्र यातून मेटेंनी नाराजीचा सूर आवळत आपण मंत्रिपदाची आशा सोडली असल्याचे जाहीर करून डेडलाईनच्या तलवारीला म्यान केले. एकूणच मेटेंच्या मंत्रिपदाच्या स्वप्नांच्या भंग पावण्यातून त्यांच्यावर द्रांक्षेच आबंट आहेत असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या एवढ्या प्रकारास जबाबदार कोण आहे हे सांगण्यासाठी बहुधा ज्योतिषाची गरज नसावी. 

धनंजय गुंदेकर, बीड 9689043949

Thursday, 4 May 2017

संघाच्या भाजपात प्रवेशासाठीही अडथळ्यांची शर्यत 
आक्रमक अन महत्वाकांक्षी राणे, सुरेश धसांच्या 
प्रवेशाविरोधात भाजपचा एक गट सक्रिय 

    राष्ट्रवादीची गटबाजी भाजपामध्ये हस्तांतरित होत असल्याचे चित्र जवळपास निश्चित दिसत असताना खुद्द भाजप मध्ये यावर काळजी व्यक्त करत काही भाजपेयीं येणाऱ्या पाहुण्यांना लक्ष्मण रेषा आखण्याची तयारी करत आहे , अन राजकीय भविष्य निर्वाह म्हणून मूळ भाजपेयीं यांनी ही घेतलेली काळजी होय. सध्या महाराष्ट्रात राणे आणि धसांच्या बाबतीत तेच घडत आहे . 

   आक्रमक अन महत्वाकांक्षी नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या नारायण राणे आणि सुरेश धस यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्च्या महाराष्ट्रभर चर्चिल्या जात आहेत. गेल्या महिनाभरापासून राज्यात नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटलांपासून ते पक्षाध्यक्षपर्यंत निरोप पोहोचलेले आहेत तर मराठवाड्यातल्या बिडात सुरेश धसांनी तर जिल्हा परिषदेची राष्ट्रवादीशी बंडोबा करत तोंडातली सत्ता काढून तिला भाजपाकडे बहाल केले आहे. या मातब्बर नेत्यांच्या भाजपात दाखल होण्याबाबत सुरुवातीला जरी अनुकूल वातावरण दिसत होते तरी मात्र आता भाजपातूनच एका गटाचा विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. 
   भाजपा पक्ष हा हिंदुत्ववादी विचारसरणी अनुसरून आहे. पार्टी विथ डिफरंन्स हि ओळख असणाऱ्या पक्षात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी इतर पक्षातील नाराजांना आणि बंडोबांना तिकीट व प्रवेश देण्यात आले. यावर भाजपने सत्ता हि मिळवली. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही तोच फॉर्मुला वापरण्यात आला. भाजपाला याचा अपेक्षित लाभही झाला मात्र आता देशभरात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर सत्तेच्या आकर्षणातून जवळीकता साधणारे "बाहुबली" नेतृत्वे भाजपेयी विचारसरणीच्या एका गटास आता नकोसे झाले आहेत. हिन्दुत्व आणि संघीय संस्काराच्या बाहेर जडणघडण झालेल्या नेतृत्वांबाबत जेष्ठ आणि कट्टर संघीय विचारसरणीच्या गटास आक्रमक आणि महत्वाकांक्षी बंडोबा भाजपात नकोसे आहेत. 
     बीड जिल्हापरिषदेत राष्ट्रवादीशी बंडोबा करणाऱ्या धसांना भाजपातील प्रवेशाचा अजूनही मुहूर्त लागेनासा झाला आहे. मछिंद्र गडाचे ट्रस्टी असणाऱ्या धसांना आता भाजपा प्रवेशासाठी गोरखपूरच्या नाथ मंदिराचे ट्रस्टचे ट्रस्टी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी नाथ पंथाचा दुआ साधत  प्रवेश करण्यासाठी लॉबिंग करण्याची वेळ आली आहे तर शिवसेना, काँग्रेस असा प्रवास असणाऱ्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आक्रमकता आणि महत्वाकांक्षी स्वभावाला जाणून भाजपकडून प्रवेशाबत अडथळ्यांची शर्यतच उभेही करण्यात आली आहे. यातून भाजपाच्या पक्षीय धोरणातील दूरगामी विचारसरणी दिसून येत आहे. या पक्षात विचारांना अजूनही स्थान असून पक्षनेतृत्व, संघ या सर्व गोष्टीचा येथे सारासार विचार आजही केला जातो हे दिसून येते. 
  नारायण राणे आणि सुरेश धस आजपर्यंतच्या एकूण राजकीय कार्यकीर्दीत व्यक्तिकेंद्रित राजकारणाबाबत ओळखले जातात. या दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत पक्षांतरात काहीतरी पदरी पडून घेतलेले आहे. स्वतःच्या मताचा गट्ठा हे आपल्या पाठीशीच घेऊन चालत असतात अशा नेत्यांच्या भाजप प्रवेशाने तेथे भाजपच्या किंवा संघाच्या विचारांचा कसलाही प्रसार न होता तेथील कार्यकर्ते नुसता झेंडा बदलणार आहेत. हे भाजपातल्या काही तज्ञ लोकांना लक्षात येत असल्याने यांच्या प्रवेशाबाबत आता अशा लोकांकडून अडथळा निर्माण केला जात आहे, कारणही तसेच आहे देशात एकहाती सत्ता मिळवताना विविध पक्षांच्या आणि विचारसरणीच्या लोकांना जवळ केल्याने आता सत्तेचा गाडा हाकताना या भाजपेयी लोकांना या लोकांचाच त्रास होऊ लागला आहे. पहिलाच कमी नाही कि त्यामुळे यात आता अशा आक्रमक आणि महत्वाकांक्षी लोकांची भर नको असे म्हंटले जात आहे. यामुळे इथून पुढे भाजप प्रवेशासाठी आपण कधीनाकधी संघाच्या अर्ध्या चड्डीत शिक्षण घेतलेले आवश्यक आहे. हे हि लक्षात असू द्या. जर भाजपने याची जाण नाही ठेवली तर राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपातही गटबाजीस प्रारंभ होईल आणि ती सुरुवात अशाच नेत्यांकडून असेल.

धनंजय गुंदेकर, बीड 9689043949

Tuesday, 2 May 2017


सध्याच्या राजकारणात .. 
विंचवाचे बिर्हाड पाठीवर 
अन सच्चे कार्यकर्ते उष्ट्या वाटीवर 


   " राजकारणात कार्यकर्ते हे बागेतील शोच्या झाडासारखे वापरले जातात. हि झाडे वाजत गाजत लावली जातात. सुरुवातीची वाढ झपाट्याने व्हावी यासाठी खतपाणी घातले जाते. परंतु एकदा ती झाडे दोन-तीन फुटाची झाली कि त्यांना काटून (ट्रिमिंग) करून त्याला आहे तेवढ्याच उंचीचे ठेवले जाते. हे झाड मारू द्यायचे नाही, वाळू द्यायचे नाही आणि मारू तर अजिबात द्यायचे नाही अशी पद्धत वापरली जाऊन त्या बागेचे सुशोभीकरण सदैव राखले जाते यालाच सत्तेचे समीकरण म्हणतात" हे आतापर्यंत आपण कुठेतरी वाचलेच असणार मात्र यात आता अजूनही वाढ झालेली आहे. शेजारच्यांच्या बागेतील चांगली झाडे आपल्या बागेत आयती उचलून पहिल्या झाडांच्या शेजारी ठेऊन पोसली जातात मात्र पहिल्यापासून बागेचे सौन्दर्य खुलवणाऱ्या झाडांकडे दुर्लक्ष केले जाते. आता हेच होत आहे सध्याच्या राजकारणात! 



राष्ट्रवादीने कारवाई केल्याने सुरेश धसांना आता भाजपचे फुल प्रपोस करत आहे. 
 एक विचार, एक झेंडा, एक पक्ष अन एकच नेतृत्व मानत राजकारणात उतरणाऱ्या याआधीच्या पक्षीय विचारला बाजूला सारत आताचे स्टेबल नेते (सुभेदार) मीच नेता, मीच पक्ष, मीच विचार आणि मीच नेतृत्व अशाप्रकारची विचारसरणी सध्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. आपोपल्या विधानसभेत पक्षांच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेतून आपलेच नेतृत्व वाढविण्यासाठी कंत्राटं वाटप, निवडी, बदल्या, योजना, समित्या बनवत व्यक्तिकेंद्रित राजकारण केले जात आहे. वरिष्ठ नेतृत्वाच्या अनबनीतून पक्षत्याग करणाऱ्या नेतृत्वाच्या
कट्टर कार्यकर्ते सदैव पाठीशी असतात अशा नेत्यांच्या तर
पक्षांच्या विचारांनी प्रेरित एकनिष्ठेने पक्षाचा विचार करतात. 
मागे 
"साहेब जहाँ हम वहा" असे म्हणत पटापट राजीनामा सत्र सुरु होते. या नेत्यांमागे जाणारे कट्टर, निष्ठावंत पहिल्यापासूनच या बगावतींची जाण ठेऊनच पेरली जातात. बीड जिल्ह्यातील आष्टी येथे राष्ट्रवादीतून बडतर्फ केलेले माजी मंत्री सुरेश धसांच्या निष्ठावंतांकडून हेच नारे देण्यात आले. आणि हेच नारे नारायण राणेंच्या बाबतीतही ऐकायला मिळतील. यापेक्षा सर्वसृत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ ला केली. या व्यक्तिकेंद्रित राजकारणाने बलशाली पक्षाधारित राजकारणाला धक्का बसून टोळकेशाहीला प्रोत्साहन मिळते. जिल्ह्यातील बऱ्याच सुभेदारांनी एकापेक्षा जास्त पक्षांच्या सुभेदारया सांभाळल्या आहेत. पक्ष विचार, पक्षाचा अजेन्डा या गोष्टी गौण झालेल्या आहेत. यापेक्षा आता आपल्या नेत्याची प्रतिमा, नेत्याचे गुणगान, नेत्याचे सर्वश्रेष्ठपणा चांगलाच फोफावला जात आहे. सर्वांच्या विकासाचा विचार, भ्रष्टचारमुक्त व्यवस्थेचा अजेन्डा घेऊन आलेल्या केजरीवालांना स्वप्रतिमा श्रेष्ठ वाटल्याने गोवा, पंजाबात टांग्या पलटी झाला तर होमग्राउंड दिल्ली एमसिडी निवडणुकांत लोकांना सत्तेच्या बाहेरचा रस्ता दाखवला. हे सर्व झाले स्वप्रतिमा पालनात. 

राजकारणातला मित्र, नाटकातील पात्र आणि चित्रपटातील चित्र कधीच स्थिर नसतात, पण या सतत पलटणार्‍या नेत्यांमुळे सामान्य कार्यकर्त्यांचे हाल मात्र किती वाईट होवू शकतात याचा अनुभव बीड जिल्ह्याला लवकरच येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेतील प्रभावी नेता या पक्षातून त्या पक्षात जातात तेव्हा पक्षाच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांची जी वाताहत होते तिच्याकडे कोणीच पाहत नाही. कार्यकर्ता होणे म्हणजे उष्ट्यावर जाण्यासारखे झालेले आहे. वरच्या लेव्हलवर सर्व काही मॅनेज होऊन खाली पक्षवाढीसाठी केलेले निष्ठेचे प्रयत्नांवर पाणी सोडण्यात येते. पक्षवाढीसाठी करण्यात येणाऱ्या राजकीय कार्यातून आणि त्यांच्या यशातून जे राजकीय वैमनस्य तयार होते त्याच्या परिपाकाचे फलित त्या कार्यकर्त्यांनाच भोगावे लागते. पोलीस ठाण्यात अर्धे प्रकरणे राजकीय वैमनस्याचाच परिपाक असतात.
या पुढाऱ्यांच्या आदेशानुसार मारहाण, दंगल, मोर्चे काढले जातात ..... 


लोकमान्य, प्रसिद्ध राजकीय पुढारी जेव्हा इकडून तिकडे अन तिकडून इकडे येतात तेव्हा ते त्यांच्या पाठीवरच विंचवासारखे बिऱ्हाड घेऊनच राजकारणात धष्ट्पुष्ट होतात मात्र यात जो पक्ष, विचार, नेतृत्व, झेंडा बघत एकनिष्ठ असतो तो भरडला जाऊन शेवटी या अशा कार्यकर्त्यांच्या माथी उष्टी वाटीतलेच मारले जाते.

- धनंजय गुंदेकर - बीड 9689043949
at Beed ....