आता बस झाले आश्वासनांचे तोरण न.प.च्या मतदारांना हवय विकासाचे धोरण
धनंजय गुंदेकर-beed 9689043949
नागरी भागातील जीवनाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सतत वाढत असून शहरी भागातील वाहतूक, घरांची समस्या, अस्वच्छता, घनकचरा विल्हेवाट, वाहतूक इत्यादी विषयांचे निराकरण महत्वाचे झाले आहे.आपल्या बीड जिल्ह्यातील नगरपरीषदचा आतापर्यंतचा कारभार बघितला तर येणाऱ्या निर्वाचितांसाठी कामाचा ढिगाराच पडलेला आहे.बकाल शहरे अन अस्वच्छ जीवनपद्धतीने आपले अतिमागास जीवन आपल्याला त्रासदायक तर आहेच शिवाय आपली बाहेरही नाचक्की करणारे ठरत आहे.या परिस्थितीला जेवढे सर्वसामान्य जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार शहर विकासाचे धोरण ठरवणारे राज्यकर्तेही आहेत.निवडणुकांमध्ये उमेदवारांना विकास करण्यात आपण किती सक्षम आहोत याचे धोरणच मतदारांपुढे जाहीर करावे लागणार आहे.
स्वराज संस्था निर्मितीमागची प्रेरणा ही सत्तेचे विकेंद्रीकरण स्थानिकलाच होऊन व्यवस्थेत सुशासनातून नागरिकांच्या समस्यांची सोप्यापद्धतीने उकल होण्याकरता करण्यात आले होते.त्याचा चांगला परिणामही उत्तरोउत्तर दिसून येत आहे.यातील निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाही बाळकटीकरणाला प्राधान्य मिळाले.सुरुवातीच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांना बरेच अधिकार होते त्यातून निर्वाचित लोकप्रतिनिधी लोककल्याणाची कामे करायचे.परंतु काळाबरोबर स्थानिकच्या अधिकारांमध्ये कमीजास्तपणा आला.आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज संस्थांतील शहरी विभागाच्या निवडणूका कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात कार्यक्रम येऊन ठेपला आहे.परंतु राज्यातील महत्वाच्या गटबंधनाची गरज असणाऱ्या पक्षांचे धोरणच जाहीर करूनही निश्चित नसल्याने उमेदवारांच्या संभ्रमातून संधिसाधूंनि चांगलीच उचल खाल्ली आहे.शहर विकास धोरणाच्या अभावातूनच पक्षप्रचार जोरदारपणे चालवणे हेच धोरण सध्या सर्व पक्षांमधून चालवले जात आहे.आपली उमेदवारी पक्की नाही हे दिसताच दुसऱ्या पक्षातून आपले नाण्याचा खणखणाट होतो का हे पाहणारे महाभागही मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातील नपच्या निवडणुकांत दिसून येते आहे.

पक्षाचा आदेश, वैचारिक अधिष्ठान, अजेंडा गुंडाळून ठेऊन काही बंडखोर अपक्ष तर काही दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात धरतात.यातून राजकीय खुमखुमीच्या उमेदवारांच्या कोलांटउड्या चांगल्याच उडत आहेत.जिल्ह्यातील राजकारण देशभरात सर्वश्रुत आहे.येथे जितके उमेदवार एका नपला असतात तेवढे उमेदवार बिहारच्या विधासभेला नसतील.सर्व पक्ष सुरुवातीला स्वतंत्र्य लढण्यासाठी अतातुर झाले होते परंतु सेना भाजप युती राज्यभरातील नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये होणार असल्याचे कालच जाहीर झाले परंतु याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिकला देण्यात आला आहे.यातून कुठे तुटते अन कुठे जुटते हे बघण्यासारखे आहे.काँग्रेस अन राष्ट्रवादीचे अजून सगळे अधांतरीच आहे.कोण कसे लढणार याचाच मेळ बसत नसल्याने मतदारही आपला कौल मौन राखत आहेत.

स्थानिकाच्या आखाड्यात त्या त्या शहराच्या विकासासाठी कोणते धोरण राबविण्यात येणार याबाबत कोठेही वाच्यता नाही.भावींच्या प्रसिद्धी पत्रकातून सर्वसामान्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मिळत आहे परंतु मतदार याबाबत आता सजग आहेत.निवडणुकाला सामोरे जाणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आता आपला प्रभाग विकासाचा अन नगराध्यकांना शहर विकासाचा राबविण्यात येणाराच विकास आराखडा सादर करावा लागणार आहे.यंदाच्या निवडणुकांमध्ये उदंड झाले भावी असा प्रकार दिसून येत आहे.यातून कित्येक नगरसेवक पदासाठी योग्य आहेत हे त्यांनाच माहिती.
आरोग्य, वाहतूक, प्रदूषण, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा इत्यादी सुविधा शहरातील सर्वांना कशा उपलब्ध होतील यासाठीच्या धोरणाची आखणी अन अंमलबजावणी कशी करणार याचे विश्लेषण अन वर्णन आपल्या शहरातील अन वॉर्डातील प्रत्येक मतदाराला आता समजावून सांगण्याची जबाबदारी सर्व उमेदवारांची आहे.बरेच नेते आता पक्षांतून कोलांटउड्या मारतात तसेच आता बरेच मतदारही आपले हित बघत आहेत अन यांची संख्या निकाली आहे यामुळे आपला विकास अजेंडा सर्वसमावेशक कसा राहील याकडेही सर्वांना लक्ष द्यावे लागणार आहे.बीड, अंबाजोगाई सारख्या मोठ्या नगरपरिषदांमध्ये विकासाचे धोरण कुणाचे चांगले आहे हे जाणून आपले अमूल्य मत देणारे मतदारही आहेत.शेवटी प्रत्येक उमेदवाराला आपला विजय होणार हे आपल्या सोबतच्या व साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीवरून वाटत असते परंतु आपले मतदार हे आपले कार्यकर्ते किंवा अनुयायी नसतात त्यांना आपण कितपत योग्य आहोत हे दाखवून किंवा आपले धोरण प्रभागासाठी कसे हितकारक आहे हे समजून सांगावे लागेल.यात आता जात, पक्ष स्वभाव या गोष्टीचा परिणाम होणार असला तरी अन सर्व समाजाचे मोर्चे निघून कास्टबेस राजकारण होईल असे वाटत असले तरीपण मतदार हा आपला विकास बघणारच अधिक आहे परंतु यातून कास्ट या प्रकारच्या राजकीय संधिसाधूपणाचा फॅक्टर परिणामकारक ठरणार आहे हे पण तितकेच खरे.
हे सर्व सोपस्कार सांभाळत पक्ष किंवा अपक्ष तिकिटावर लढण्यास सज्ज झालेल्या प्रत्येक उमेदवाराला आता आपला विकास अजेंडा मतदारांपुढे सादर करावा लागेल अन त्याच्या परिपूर्णतेचा आश्वासनही द्यावे लागेल.
No comments:
Post a Comment