Sunday, 18 June 2017

शतप्रतिशत राजकारण !


१.बीड राष्ट्रवादीत युवा पिढीचे धुमशान 
पक्षश्रेष्ठींकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे पक्षसत्तेच्या चाव्या 




स्थापनेपासून सत्तेत राहिलेल्या पक्षाची कधीनव्हे ती पूर्णत्वाने सत्तेबाहेर फेकली गेलेली अवस्था आजघडीला बीड जिल्ह्यात झालेली असताना पक्षश्रेष्ठींकडून याबाबत दखल घेतली जाऊन या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी, झालेल्या दगाफ़टक्यासाठी, केलेल्या विश्वासघाताची फेड करण्यासाठी सळसळत्या रक्ताच्या, धुमशान घालत आपल्या हाती घेतलेल्या कामाची परिपूर्ती करणाऱ्या युवाशक्तीच्या हाती पक्षवाढीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. 
येणाऱ्या पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या पक्षविस्तारासाठी अशाप्रकारचे धाडस दाखवणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा बीड जिल्ह्यातील एकमेव पक्षही ठरला आहे. राष्ट्रवादीच्या जेष्ठांनी जिल्हाध्यक्षपदी निवडलेल्या बजरंग सोनवणेंना या पदासाठी योग्य समजत या निवडीबाबत आभार व्यक्त तर केलेच आहे शिवाय या जिल्ह्यातील गटबाजीला आला घालण्यासाठीहि हि निवड केल्याचे अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मनोगत बैठकीत व्यक्तही केले. सर्वसाधारण परिस्थितीतल्या आणि आपल्या मातीशी नाळ जोडून असणाऱ्या बजरंग सोनवणेंच्या जिल्हाध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर जिल्हाभरातील युवकांमध्ये राष्ट्रवादी पक्षाबाबत ऐक नवी ऊर्जा देणार धुमशान तयार झालं. या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देण्यात आलेल्या न्यायाची दखल जिल्हाभरातून घेतली गेली. घराणेशाहीचा पक्ष अशी ओळख असलेल्या पक्षाबाबतचा पूर्वग्रह मोडीत या निवडीने मोडीत निघाला.
 कालपरवा राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यातील गर्दीने राष्ट्रवादीची क्रेझ जिल्ह्यात युवकांमध्ये किती बनली आहे हे दर्शवून दिले आहे. या मेळाव्याचे आयोजन - नियोजन बीड विधानसभेतील प्रभावी नेतृत्व संदीप क्षीरसागरांकडे असल्याने या गर्दीत त्यांचे समर्थक प्रचंड उत्साही दिसून येत होते. राज्यात मध्यावधीबाबत तर्जवितर्क लावले जात असताना राष्ट्रवादीकडून याबाबतची चाचपणी आणि तयारी या मेळाव्यातून दिसून आली. मात्र या मेळाव्याला आ जयदत्त क्षीरसागर,  नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी फिरवलेली पाठ, पवारांकडून घरघुती वाद घरातच मिटवण्याचा सल्ला, यातून लवकरच राजकीय भूकंपाच्या बातम्या निघणार आहेत.
   युवकांना अनुभव कमी असतो, वृत्ती उतावीळ असते, स्वभाव चंचल असतो असे आरोप केले जातात मात्र या अनुभवाच्या कमतरतेमुळे राजकारणातील कर्तबगारी सर्वाधीक युवकांमध्येच असते हेही विसरता येणार नाही. राजकारणातल्या जादूची कांडी, छक्के पंजे, कुरघोडी यांना दुय्यम स्थान देत युवा पिढी हि परिवर्तनासाठी आग्रही असते. 
हेच तथ्य धाकल्या पवारांनी जाणलं अन जिल्ह्यात पक्षाच्या सोनेरी वाटचालीसाठी बजरंग बदल घडवला.
     
 या बदलणे जिल्ह्यातील गटतट बाजूला झाले. जिल्हाभरात एकमुखाने नेतृत्वाचा स्वीकारही झाला. आ पंडित, सोळंके या जेष्ठानीही या निवडीचे स्वागत करून पक्षाच्या हितसंबंधाला प्राधान्य दिले. कालपरवा झालेल्या मेळाव्यात धाकल्या पवारांनी धसांवर तोंडसुख घेत राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांवर प्रकाश टाकत आपल्या अमर पक्षनिष्ठेबद्दल समस्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या उपरांत जिल्हामध्ये बरीच राजकीय यादवी माजणार यातून मात्र राष्ट्रवादीच्या लिटी पथ्यावर पडते हे आता काळच ठरवेल तथापि उर्वरित नाण्याची दुसरी बाजू खालील अग्रलेखात....

-------------------------------




2 कमळाचे फुल जिल्ह्यात बनतेय बळकट, 
नाराजांना राजाश्रय तर पक्षबाह्य हितसंबंधी पक्षातच होऊ शकतात डेरेदाखल




 जिल्ह्यामध्ये एकूण ६ पैकी ५ आमदार हे भाजपच्या कमळावर निवडून आलेले आहेत, यातील पराभूत झालेले आ मेटे यांचे विजयी प्रतिस्पर्धी आ जयदत्त क्षीरसागर यांना पक्षाकडून जिल्हा परिषद निवडणुकांपासून पक्षाकडून बायकॉट करण्याचे धोरण राबविले जात आहे, कालपरवा झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही त्यांची अनुपस्थिती होती. पक्षाची धुरा धाकल्या पवारांनी युवा नेतृत्वांकडे बहाल केल्यामुळे नाराज आ क्षीरसागर लवकरच ना पंकजा मुंडेंच्या भाजपाला जवळ करू शकतात. यातून जिल्ह्याच्या राजकीय वातावरणात राजकीय वादळ सतत घोंगावत राहणार आहे. भाजप प्रवेश लांबणीवर पडल्यापासून सुरेश धस महादेव जाणकरांच्या पक्षात जाण्याचाही अफवा आता जोरात उडत आहेत. या अशा राजकीय पुड्यानी राजकीय वातावरण सतत चर्चेत राहते. काही काळापूर्वी बोचऱ्या हिवाळ्याच्या थंडीत आणि कडक उन्हाळ्यात राजकीय घडामोडींना गती यायची आता मात्र बाराही महिने तेच चालू असते. येत्या काही दिवसात आष्टीतील जिप सदस्यांचे सदस्यत्व राष्ट्रवादीकडून रद्द करण्यात आल्यानंतर तेथे निवडणुकीतून राजकीय रणधुमाळी माजेल आणि यात भर बीड विधानसभेतील आ क्षीरसागरांच्या निर्णयावरही राहील. आजघडीला राष्ट्रवादीच्या तोफांच्या तोंडावर असणाऱ्या धस, आ क्षीरसागर, मुंदडा यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून अभद्र टीकाटिप्पणी चालू आहे यासाठी भाजप समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या स्थापनेवरच बूड धरून टीका करण्याचा सपाटा धरण्यात आला आहे. भाजपा व राष्ट्रवादी हे जिल्ह्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी प्रमुख प्रतिस्पर्धी बनल्याने उर्वरित शिवसेना, संग्राम, काँग्रेस नाममात्र राहिले आहेत.
   भाजपमध्ये गटतट लक्षवेधक असे नसल्याने भाजपा परळीकडून एककेंद्री झालेली आहे. यातून जिल्ह्यातील राजकारणातील जयपराजयला परळीशि जबादार धरून जसे चालता येते तसे मात्र राष्ट्रवादीबाबत घडत नव्हते ते आता या मेळाव्यातील सुसूत्रतेनी घडेल असे वाटते मात्र या मेळाव्यातच नाराजीची ठिणगीही पडली आहे ज्याचा वानवा येत्या काळात दिसून येईल. कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेऊ म्हणणाऱ्या पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांचे सोडाच महिला जिल्हाध्यक्षांना विचारात न घेताच पदोन्नती देत नव्याने पक्षात आलेल्या नेतृत्वाच्या जिल्हाध्यक्षाची माळ घातली. सोबतच कार्यक्रमाच्या बँनरवरून आणि भाषणातून जेष्ठ नेत्यांना वगळण्यातही आले. 
   या सर्व गोष्टींतुन भाजपने योग्य बोध घेत आपला गुप्तपणे आढावा घेण्याचा कार्यक्रम आखत राष्ट्रवादीला पुन्हा एकदा चेकमेट करण्यासाठी जोरात पाऊले उचलली आहेत. कर्जमाफी मिळवून देण्याचे श्रेय विरोधकांना न ठेवता भाजपने ते शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा घाट आधीच रचला होता. यात माध्यमांनीहि शेतकऱ्यांची बाजूच लावून धरल्याने ते त्यांना अधिकच सोपे गेले. आजघडीला निवडणूक झाल्या तर भाजपने स्वबळाची पूर्ण तयारी केलेली आहेच. आज जे राजकारण बीडमध्ये चालले आहे तशाच प्रकारच्या घडामोडी राज्याच्या इतरही जिल्ह्यात घडत असुन भाजप शक्य नसेल तेथे आयात उमेदवारांचा भरणा पक्षात करत आहे. एकूणच सत्ता हेच सत्य मानत शतप्रतिशत राजकारण आजच्या काळात घडून येत आहे. आणि या राजकारणाच्या केंद्रभागी बीड जिल्ह्यासारखा मागास जिल्हा महत्वपूर्ण बनल्याने या जिल्ह्यातील प्रश्न बाजूला सारले जाऊन कुरघोडीचे राजकारण वर डोके काढताना दिसून येत आहे. 
  उपरोधिक तळटीप :-  या जिल्ह्यात शैक्षणिक सुविधांचा उच्च शिक्षणाचा आभाव आहे. येथे फक्त राजकारणाला वाव आहे.  अशा परिस्थितीत परळी किंवा बीड तालुक्यात राज्यशाश्र विषयाचे नक्कीच विद्यापीठ सुरु केले जाऊ शकते. ज्यातून दर्जेदार युवानेतृत्वांची खाण या जिल्ह्यात अजून उपजेल आणि ती निरंतरपणे विकासासाठी संघर्ष करेल. 


No comments:

Post a Comment