पत्रकारिता हे लोकशिक्षण, समाजसुधारणेचे महत्वपूर्ण माध्यम पूर्वीही होते, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. समाज हा परिवर्तनशील असतो यातच पत्रकारिताही कालानुरूप बदलत गेलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कुप्रथांपासून इंग्रजांच्या दमनशाहीविरोधात जनजागृतीसाठी ते आजच्या काळातील लोकशाही सदृढीकरणासाठी पत्रकारिता उपयोगी ठरते. स्वातंत्र्यप्राप्ती ते आणिबाणीपर्यंतची ध्येयवादी पत्रकारिता त्यानंतर व्यावसायिक पत्रकारिता बनली. सरकार धार्जिणी "बांधिलकी पत्रकारिता आणि विरोधाकधार्जिणी "विकसनशील पत्रिका" एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावर लोकशिक्षण, जनजागृतीचा पाया भक्कम बनवत होते. यानंतर आलेल्या जागतिकीकरणाने वैचारिक पत्रकारितेची जागा जाहिराती पत्रकारितेने घेतली. यातूनच संपादकांपेक्षा अर्थपुरवठा करणाऱ्या जाहिराती महत्वाच्या ठरू लागल्या. वृत्तपत्राची संपादकाच्या नावाने असणारी ओळख संपुष्ठात येऊ लागली. याच काळात विकसित होत आहे आव्हानांना थोड देत उभा राहत आहेत नवपत्रकार आणि त्यांची नवपत्रकारिता.
नव्या जमण्यासोबत परिवर्तनाच्या नांदीत पत्रकारिताही बदलती आहे. या पत्रकारितेत नवपत्रकारांसमोरील पहिल्यापेक्षा कितीतरी आव्हाने आज आ वासून उभी आहेत. प्रथमतः स्वातंत्र्याच्या काळात राजकीय पुढार्यांनी निर्ढावलेल्या इंग्रज सत्तेच्या विरोधात पत्रकारितेचा हत्यार म्हणून वापर केला होता मात्र आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर निर्ढावलेल्या पुढाऱ्यांकडून पत्रकारितेची हत्या होताना दिसून येते आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी घेत कित्येकजण पत्रकारितेत येतात. या आलेल्या नवपत्रकारांची व त्यांच्या पत्रकारितेची स्वप्ने हि आकाशाला गवसणी घालणारी असतात. मात्र या बाजारभूमीकी पद्धतीत या पत्रकारितेची घुसमट होताना दिसून येत आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा पाहण्यास मिळते. यापासून पत्रकारिता क्षेत्र दूर राहू शकत नाही. या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवताना नवपत्रकारितेला कडवट संघर्षाचा सामना करावा लागतो. येथे वृत्तपत्र चालवताना बातमीतील ताजेपणा, बातमीमूल्य टिकवत व्यवसायाच्या दृष्टीतून हितकारी असणे हि गरजेचे असते.
सोशल मीडियाने सामान्यांना व्यक्त होण्याचे, माहितीच्या हस्तांतराचे माध्यम उपलब्ध करून दिल्याने पत्रकारितेला पर्याय बनू पाहत असलेल्या माध्यमांपुढे नवपत्रकारांना आपली कार्यक्षमता, अचूकता, सापेक्षता,सत्यता सिद्ध करावी लागत आहे. जगाच्या कोण्यातली कोणतीही घटना क्षणार्धात उपलब्ध होत आहे. पूर्वी कोठे काय घडले हे माहित होण्यासाठी लोक वृत्तपत्रे वाचत. परंतु आज मात्र त्या घटनेतील सत्यता प्रमाणित होण्यासाठी वृत्तपत्रे वाचावी लागत आहेत कारण घटना सोशल मीडियातून सर्वदूर पोहोचलेलीच असते.
आजघडीला नवपत्रकारांना लिखाणातील स्वातंत्र्याबाबत पारतंत्र्य अनुभवावे लागत आहे. राजकीय दबाव, राजकारण्यांचा प्रभाव या गोष्टी लिखाणातील स्वातंत्र्याला आडकाठी बनत आहेत. निर्भीड, निष्पक्ष लिहिताना सोशल मीडियावर जसे मांडता येते तसे वृत्तपत्रात आपण वृत्तपत्राच्या भवितव्यासाठी लिहू शकत नाहीत. उलट आपल्या विचारांना पायदळी तुडवत अविचारांचे समर्थन करण्याची वेळ नवपत्रकारांवर आलेली आहे. या क्षेत्रात पाय ठेवणाऱ्या नवपत्रकारास यातील खाचखळगे माहित नसतात अशातच विविध प्रलोभनांना बळी पडत पत्रकारिता वाहवत जाण्याचेही कित्येक उदाहरणे आहेत. धकाधकीच्या या जीवनात पत्रकारांच्या आरोग्याचा समतोलही ढासळण्याचे कित्येक उदाहरणे आपण पाहू शकतो.
शिक्षक, डॉक्टर, आणि पत्रकार या तिन्ही व्यवसायांतील पहिले दोन बाजूला सोडले तर वैचारिक अधिष्ठान असलेली पत्रकारिता आजच्या काळात पक्षपातीपणामुळे बटीक होताना दिसून येत आहे. अशात नवपत्रकारांना या अशा धोरणांपासून अलिप्त राहत सापेक्ष पत्रकारितेला महत्व देणे गरजेचे आहे. पत्रकारितेतील बदल अनिवार्य असला तरी बदलाची दिशा योग्य असावी. मास मीडियातील पत्रकारितेबाबतच्या विश्वासहार्यतेला तडा जात असतानाच मुद्रित माध्यमातील पेड न्यूज प्रकारही फोफावत आहे अशात नवपत्रकारीतेला सावरणे गरजेचे आहे.
आजची नवी पिढी सजग आणि जगाशी संबंधित असल्याने त्यादृष्टीने माध्यमांनी विषय स्वीकारून आशयसमृद्ध मांडणी करणे गरजेचे आहे. प्रत्येक माहितीत नवीन विचार, नवा आशय असायला हवा. पारंपरिक माध्यमांसमोर नवमाध्यमांचे मोठे आव्हान असले, तरी माध्यमांचा हा विस्तार आणखी गतीने होणार असून, त्यात अनेक संधी आणि आव्हाने दडलेली आहेत. या संधी साधण्यासह ती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारितेमध्ये येणाऱ्या युवा पिढीने सखोल अभ्यास, वैचारिक बैठक पक्की करावी लागणार आहे. आज देशाला नवपत्रकारितेतून विकास पत्रकारिता आवश्यक आहे. यासोबतच बदलत्या काळानुसार पत्रकारिता, माहितीचे स्रोत, तंत्रज्ञान बदलले, तरी ज्ञानसंपादनाची गरज कायम राहणार आहे. यासाठी नवपत्रकारितेतील सर्व आव्हाने स्वीकारत नकारात्मक पत्रकारितेला बाजूला सारत सकारात्मकताही आत्मसात करावी यातूनच लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट बनत बेछुट सत्तेवर अंकुश राहत लोकशिक्षण, जनजागृती होत लोकशाही वृंधिगत होत उत्तरोउत्तर विकास होतो.
धनंजय गुंदेकर - 9689043949



No comments:
Post a Comment