Friday, 17 November 2017

उठं बावा आसू पुस ; बाकी कोणी खाली नाह्यी...!! पंजी, कमली, घडाय, बाण, तुह्यं कोणी वाली नाह्यी...!

राज्यातल्या शेतकऱयांचा वाली आता दस्तुरखुद्द शेतकरीच !



  ज्या नावाने आता अन्याय, अत्याचार, संघर्ष ओळखला जातो ते नाव आज शेतकरी म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाची वेळ या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आलेली आहे. राज्यात अन देशात ज्या सरकारची सत्ता आहे त्या सरकारचा राज्यप्रमुख खानापूर गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर  'शेतकऱ्यांच्या छातीवर नाही तर पायावर गोळ्या घालायला पाहिजे होत्या' असे थेट इंग्रजांच्या शासनातले फर्मान काढल्यागत बेपर्वाही वल्गना करतो तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिसून येते. स्वप्नांच्या दुनियेतले अच्छे स्वप्ने दाखवत सर्वसामान्यांना भुरळ पाडून हस्तगत केलेल्या सत्तेचा गोळीबारातून कृतज्ञता फेडण्याचा प्रकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याच माथी पुन्हा एकदा आल्याचे दुर्दैव हे महाराष्ट्रासाठी नवं असं नाही. याआधीच्या सरकारनेही अशाच गोळीबारातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना चिरडण्याचा महापाप केले होते याच पापाचा घडा भरल्यानंतर याच शेतकऱ्यांनी त्यांना घरी बसवून मोठ्या अपेक्षेने युती पक्षाला सत्तेचा डोलारा दिला होता. आजघडीला हे सरकार शेतकरी हि व्यवस्थाच संपवण्याच्या इराद्याने राज्यशासन चालवत आहे. 

   ३ वर्षे उलटून गेली 
   तरी आजही शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय झालेला नाही अन जे निर्णय झाले ते अत्यंत फसवे तर निघालेच शिवाय त्या योजनांचा लाभ दिला जाणार असे सांगून लोकांना रांगेत उभा करण्याचा महाप्रतापही याच शासनाने केला. ना शेतकऱ्यांच्या पिकाला भाव आहे ना शेतकर्यांना कोणती दिलासा देणारी योजना. निवडणूक काळात स्वप्नांच्या दुनियेत नुसतं फिरवून लोकांना अपेक्षित करून ठेवलेल्या या सरकारने आता आपले खरे रूप दाखवायला सुरु केले आहे. या सरकारने दिलेली कर्जमाफी किती फसवी हे लोकांना आता दिसून आले आहे. नोकरशाही, यंत्रणा चालवायचा तोकडा अनुभव यातून या सरकारचे कित्येक निर्णय साफ फसलेले आहेत. सुरुवातीला देशभरात नोटबंदी करून या सरकारने जनतेला स्वतःच्याच पैश्यासाठी रांगेत उभा केले. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या शे-दोनश्यांची कर्जमाफी करत 
शेतकर्यांना वेड्यात काढण्याचा धंदा 
या सरकारनेच केला. जर या सरकारला कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील अनुभवच नव्हता असं जाहीर करावे लागते, सहकारमंत्री नियोजन चुकले हे धडधड सांगतात यावरून या सरकारचे सरकार चालवण्याच्या एकूण कौशल्यावर प्रश्नचिन्ह आपोआप निर्माण होत आहे.  सत्ताधाऱ्यांच्या धोरणांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडणारे विरोधी पक्षांची भूमिका या राज्यात अत्यंत नगण्य आहे. दोन्ही मुख्य विरोधी पक्षांची काही मोजकीच नेतृत्वे सत्तेच्या विरोधात भांडत आहेत, विरोधकांच्या मरगळीतून सत्ताधाऱ्यांचे फावते आहे, मात्र बऱ्याच काळापासून सत्ता भोगून तृप्त झालेले विरोधक आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्यास अनुत्सुक दिसून येत आहेत. या राज्यात अभूतपूर्व असा राज्यव्यापी संप शेतकऱ्यांनी पुकारला. या संपात 
स्वतः शेतकऱ्यांनीच नेतृत्व
 केल्याने राज्यशासनाला या संपापुढे हतबल व्हावे लागले होते. कालपरवा नगर जिल्ह्यातील खानापूर येथे सरकारच्या पोलिसांकडून गोळीबार झाला या गोळीबारात २५ ते ३० शेतकरी जखमी झाले. यानंतर या आंदोलनाने उग्र पेट घेण्यास सुरुवात केली आहे. आजघडीला शेतकऱ्यांचा वाली हा शेतकरीच आहे. विदर्भाचे एक नामवंत कवी वैभव अनिल भिवरकर( ९४२२७८५७०७) यांनी शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीत लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढे यायला पाहिजे हे त्यांच्या कवितेतून सादर केले आहे.  

कर्ज बुडलं तं बुडू दे, ह्या देश बुडणार नाह्यी..!
एंडरीनचा डबा कधीबी हाती घ्या'चा नाह्यी...!

ते मतं द्या म्हणले का, दाखून दे रे पावर तू ..!
सरसकट लंबे कर, निवडून आण वावर तू...!

पंजी, कमली, घडाय, बाण, तुह्यं कोणी वाली नाह्यी...!
लढाई तुलेच लढा लागते, बाकी कोणी खाली नाह्यी...!
उठं बावा आसू पुस, माणूस माणसाचा नाह्यी...!

धनंजय गुंदेकर - बीड 9689043949

No comments:

Post a Comment