Wednesday, 17 May 2017

..... तर धनजंय मुंडेंना परळी विधानसभा विजय हे मृगजळ ठरेल




लोकनेत्याचा वारसा आजही लोकविश्वासास पात्र 


धनंजय गुंदेकर बीड 9689043949


 एका तालुक्यापुरती चर्चेत असणारी निवडणूक सत्तास्पर्धेत प्रतिष्ठेची बनवली जाते. तुल्यबळ दिसणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये साम-दाम-दंड-भेद या नीतींचा वापर होतो. फिरवा-फिरवी होते.मतदारांना वाटावाटी होते. निकालानंतर पराभूत स्पर्धकास थेट राज्याच्या निवडणुकीत पराभूत केल्याच्या मानसिकतेत दाखवलं जाते. परळीच्या बाजार समितीच्या निवडणुकांतील मुंडे भगिनींचा पराभव राज्यभरात गाजवला गेला. विरोधी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारा हा विजय आणि यातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयाचे अंदाजही वर्तवायला तज्ज्ञांनी सुरुवातही केली. माध्यमे, सोशल मीडियातील काही उथळ राजकीय विश्लेषकांनी पंकजा मुंडे यांना फुकटात सल्ला वाटपाची खैरातच सुरु केली आहे. याउलट धनंजय मुंडे यांच्या प्रशंसेचे पूलही बांधण्यात आले. एकूणच आजघडीला येणाऱ्या विधानसभेबाबत अंदाज बांधणे संपूर्णपणे अतार्किक ठरते. 
  १९९२ पासून स्व गोपीनाथ मुंडेंचे विशेष लक्ष असलेल्या परळीला मराठवाड्याची बारामती समजले जाते. या तालुक्याला या लोकनेत्याने विकासाची गंगाच वाहिली. अशा या लोकनेत्याच्या पश्चात आजही नामदार पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे हा वारसा समर्थपणे चालवत आहेत. राजकारणातील परिवर्तनासंबंधी आग्रही असणाऱ्या या भगिनींना सुरुवातीच्या काळात संघर्षाचा सामनाही करावा लागत असला तरी निवडणुकांच्या ऍक्ट आणि टॅक्ट बाबत बोलताना मुंडे भगिनींना ऍक्टबाबत बोलत धनंजय मुंडेंच्या टॅक्ट शिकण्याचा सल्लाही त्यांना दिला जातो. तटस्थेतेतून जेव्हा आपण राजकीय भूमिकेचे विश्लेषण करण्यात येते तेव्हा मुंडे भगिनींची राजकीय पॉलिसी हि राजकीय परिवर्तनाची आहे. राजकारणातील क्षुल्लक कामांना डावलण्याचे, महत्वपूर्ण नसलेल्या बैठकांना टाळणे, संपर्कात नसने या जरी चुका त्यांच्याकडून होत असल्या तरी त्या त्यांच्या एकूण येणाऱ्या धोरणांच्या अमलबजावणीतून आपोआपच गढून येतात. भाजप हा घराणेशाहीला डावलणारा पक्ष आहे. या पक्षात जो काम करतो, त्यांच्या उद्दिष्ठांची परिपूर्ती अव्याहतपणे करतो तीच व्यक्ती नेतृत्वस्थानी जाते. म्हणूनच राजकीय वारस्यासोबतच पक्षातील विचारधारेशी सुसंगत कार्यपद्धतीत अवलंबणे या पक्षात गरजेचे आहे. 


  राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या टॅक्टनी चार निवडणुकांमध्ये निवडणुकांमध्ये गुलाल उधळून मुंडे भगिनींच्या माथी बुक्का लावल्याची चर्चा होत असली तरी मात्र मुंडेंनी जिंकलेली  वैदयनाथ बँक व साखर कारखाना निवडणूका मापातून वगळता येणार नाहीत. विधानसभेच्या ओसरीवर धनंजय मुंडेंचा ठोकलेला तंबू प्रभावी दिसत असला तरी जनमानसाची भावना मात्र आजही साहेबांवर आहे.जलयुक्त, परळी औष्णिक विद्युत केंद्र संचनिर्मिती, परळी रेल्वे प्रश्न, महिला सक्षमीकरण, आरोग्यसेवा यातील मुंडे भगिनींचे कामे मतदार थोडेच विसरणार आहेत? मुळात एकट्या परळी विधासभेच्या हार या जित ने राज्याच्या राजकारणावर किती फरक पडणार हा अभ्यासाचा विषय ठरेल मात्र आजही लोकसभेत खासदार प्रीतम मुंडे यांच्या तोडीचा उमेदवार जिल्ह्यात नाही. पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघात जो निधी खर्च केला आहे त्याचा लाभ येणाऱ्या वर्षात तेथील मतदारांना दिसून येईल तेव्हा मात्र जिवाभावाचा समजरे जाणारे धनंजय मुंडे हे तेथील मतदारांसाठी दुय्यमही ठरू शकतात हि शक्यता नाकारता येत नाही. 

  आपल्याला कोणाची किती प्रगती होत आहे व कोणाची किती प्रगती होईल हे समजावण्यासाठी कासव आणि सशाचे उदाहरण दिले जाते. एक निरपेक्ष राजकीय विश्लेषण करताना धनंजय मुंडेंचा वेग आज त्या गोष्ठीमधील सशाच्या वेगासारखा दिसून येत आहे, तर मुंडे भगिनी कासवाच्या गतीने परळीमध्ये आपला प्रभाव राखून आहेत.
मात्र यात मुंडे भगिनींची गती जरी संथ असली तरी ती टिकाऊ आहे आणि तिला संघर्षाचा वारसाही आहे. लोकविकासाचा अखंड झरा असणाऱ्या स्व मुंडे साहेबांचे कर्तृत्वाचा विसर परळीकरांना पडेल असे होणे अवघड आहे. वादळी,  धाडसी व्यक्तिमत्व समजले जाणारे धनंजय मुंडे आणि संयम, कार्यशैलीबाबत ओळख असणारया मुंडे भगिनी यांचा जेव्हा सामना होईल तेव्हा मुंडे भगिनींकडे शास्वत प्रभावाची यंत्रणा असेल तर धनंजय मुंडेंकडे करिश्माइ कर्तृत्वाची फळी. करिश्मा हा कधीनाकधी उतरतो तेव्हा शास्वत प्रभावी नेतृत्व विजयाला गवसणी घालते. 

  एकूणच आज जरी धनंजय मुंडेंसाठी "फील गुड" वातावरण दिसत असले तरी हे मृगजळाच्या लहरींचे संकेत आहेत. मुंडे भगिनींनी वेळ न देणे, कार्यर्त्यांचा संपर्कातील अभाव या एवढ्याशा गोष्टी या भगिनींसाठी कष्टाच्या नाहीत. त्यांनी त्यांच्या धोरणात जर या गोष्टींसाठी वेळ दिला तर जनमत केव्हाही बदलू शकते, सोबतच केलेले विकासकामे, समाजाशी बांधिलकी, लोकांची आजही असलेली भावना यांमधून परिवर्तन घडू शकते. धनंजय मुडेंनी यात वाहवत जाण्याने हातचे पण जाण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर येऊ शकते.

No comments:

Post a Comment