Thursday, 25 May 2017

राजकीय आरोग्याचे युवावैद्य - डॉ प्रीतम मुंडे ते डॉ योगेश क्षीरसागर

जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेसाठी कटीबध्द, भविष्यात नेतृत्वाची संधी


सकारात्मक - धनंजय गुंदेकर 9689043949


निरामयी आणि निरागस आयुष्यात आरोग्याचे अनन्यसाधारण महत्व आहे .सामान्य जीवन सुसह्य करण्याच्या घोषणा करून सत्ता मिळवणारी एक संपूर्ण राजकीय पिढी आम्ही पाहितलेली आहे मात्र येणाऱ्या राजकीय नेत्याकडे पाहताना जनतेच्या आरोग्याकडे पाहण्याचा राजकीय कल कसा बदलला आहे ज्यातून मोठे आश्वासक अन अपेक्षित चित्र समोर येत आहे. आजच्या युवा नेत्यांनी राजकीय परीघ अधिक व्यापक करताना लोकांचे आरोग्य सांभाळायचे जे दायित्व स्वीकारले आहे ते निश्चितच अभिनंदनीय आहे. 

  'आरोग्याची दाई म्हणजे विमल ताई' असे संबोधले जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील माजी मंत्री विमल मुंदडा यांनी जिल्ह्यात आरोग्याच्या प्रश्नांना संपवत जिल्ह्याचे आरोग्य सदृढ करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या पश्चात मात्र बीड जिल्ह्याच्या वैद्यकीय सेवेत तज्ञांचा अभाव, अपुरी औषधे, सरकारी डॉक्टरांची उदासिनता, अपुऱ्या सुविधा, साहीत्याची वानवा, रुग्णांकडे दुर्लक्ष असे वातावरण होते. आपल्या या मागास जिल्ह्यात औषधउपलब्धतेसह शस्त्रक्रियाही मोजक्याच करण्यात येत होत्या. परंतु आता परिस्थिती बदलत चालली आहे. जिल्ह्याला लाभलेल्या खासदार प्रितम मुंडे व बीड भागात सक्रिय युवानेतृत्व योगेश क्षिरसागर हे पेशानी डॉक्टर आहेत. राजकारणासोबतच यांना आपल्या क्षेत्रात काम करण्याची विशेष रूची व तळमळ आहे. यातुनच सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत यांचा सतत आग्रह दिसुन येतो आहे. आज जिल्ह्यात आरोग्यविषयक उपक्रमांतर्गत विविध आजारांना आळा बसत आहे यात खा. डॉ प्रितम मुंडे यांचा सहभाग बराच आहे. तर बीड तालुक्यात डॉ योगेश क्षिरसागर यांनी आपल्या वैद्यकीय सेवेत सामाजिकतेचे भान राखत मोफत उपचारासह काकु-नाना प्रतिष्ठान आयोजित आरोग्य शिबीरात राज्यभरातील प्रमुख तज्ञ डॉक्टरांना तपासणी, उपचारासाठी पाचारणही केले होते. त्यांनी आयोजित केलेल्या बीड येथील आरोग्य शिबीरास भरभरून प्रतिसाद मिळाला.
  खा. प्रीतम मुंडे यांनी जुलै-ऑगस्टच्या दरम्यान जागेअभावी २०० खाटांच्या बीड जिल्हा रुग्णालयात ५०० खाटांची मंजुरी असतानाही विषय प्रलंबित पडला होता. यात त्यांनी विशेष लक्ष घालत गृह विभागाची जागा उपलब्ध करून घेण्यात यश मिळवले. यासोबतच अंबाजोगाई येथे आयुर्वेदिक महाविद्यालय सुरु करावी म्हणून मुख्यमंत्र्यांना "डॉक्टरी" पाठपुरावा केला यात त्यांनी त्यांचा हिरवा कंदीलही मिळवला आहे. यासोबतच त्यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील पहिले "वेलनेस क्लिनिक" अंबेजोगाई येथे सुरु करण्यात आले आहे. दिनांक २३ ते २७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय विभाग यांच्या सयुंक्त विद्यमानातून आयोजित महाआरोग्य शिबिराचा लाभ जिल्ह्यातील हरेक रुग्णापर्यंत पोहोचला त्यात खा. प्रीतम मुंडे यांच्या नियोजनाचा उत्कृष्ठ सहभाग होता. खा प्रीतम मुंडे जिल्ह्यातील सर्वसामान्यांना जडलेल्या दुर्धर आजाराच्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी, जे जे हॉस्पिटलमधील उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असतात हे विशेष. आता चालू असलेल्या दीनदयाल उपाध्याय आरोग्य शिबिरात खा प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्याला यात सहभागी करून जिल्ह्यातील आरोग्य समस्यांना लगाम कसण्याचा काम केले आहे. कालच्या गुरुवारपर्यंत ६१ हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी या अभियानात नोंदणी केली आहे. यात उत्तरोउत्तर वाढच होत जाणार आहे. यातील कित्येक रुग्णांना चांगल्या तज्ञांकडून उपचार मिळण्याची सुविधा आहे.
   खा प्रीतमताईंप्रमाणेच बीड भागातही जिल्ह्यातील उत्कृष्ठ युरोसर्जन असणारे डॉ योगेश क्षीरसागर हेही आपल्या क्षेत्रातील उत्कृष्ठतेसोबतच समाजकारण-राजकारणही प्रभावीपणे साधताना दिसून येत आहेत. डॉ योगेश क्षीरसागर यांची ओळख हि शांत, संयमी, अभ्यासू, विकासासाठी पोटतिडकीने कार्ये करणारे युवा नेतृत्व म्हणून आहे. गेल्या महिन्यातील काकू-नाना प्रतिष्ठान आयोजित आरोग्य शिबीर, योग शिबिरांचे आयोजन, गोरगरिबांसाठी मोफत  शस्त्रक्रिया इत्यादींचे आयोजन त्यांनीही केले आहे. येणाऱ्या योग दिनी त्यांनी बीडवासीयांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्याची तयारीही सुरु केली आहे. आतापर्यंत २५ पेक्षा जास्त अवघड शस्त्रक्रिया, त्याही मोफत करणाऱ्या डॉ क्षीरसागरांना राजकीय काटशह चांगल्या प्रकारे जमत असून आपल्या पेशाप्रमाणेच ते अवघड राजकीय दबावाचीही चांगली शस्त्रक्रिया करतात असे बोलले जाते. 
   राजकीय चालीरीतींसोबतच आपल्या पेशातही कर्तबगारी असणे हे नगण्यच मानले जाते. या पेशाचा उपयोग समाजकारणासाठी करतच राजकारणातील यशाचा शिवधनुष्य उत्कृष्ठरित्या पेलणे हा अजोड सुयोग्य या राजवैद्यांना पुरेपूर जमला आहे. आज स्व. विमल मुंदडांच्या आरोग्य विषयक कार्याप्रमाणेच जिल्ह्याच्या राजकारणात या वैद्यांची कार्ये सर्वांना आरोग्य यासाठी हक्कासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येत.विविध समस्यांचा-प्रश्नांचा गाढा अभ्यास, त्या प्रश्नाची अभ्यासू मांडणी, उपाययोजनांसाठी सततचा पाठपुरावा, मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करण्याची तयारी या सर्व जमेच्या नेतृत्वगुणांमुळे येणाऱ्या काळात खा प्रीतम मुंडेंना त्यांच्या कार्याची पावती म्हणून केंद्रात नेतृत्वाची संधीही मिळू शकते. हे शक्यतेतील आडाखे सत्याही उतरण्याचे संकेत आता मिळू लागले आहेतच. त्यांच्यासोबतच बीडच्या राजकारणातील राजवैद्यांनाही आपल्या सेवेतून जनसामान्यांचे प्रेम मिळण्यास वाव आहे.

3 comments: