Friday, 5 May 2017

मेटेंना द्राक्षे आंबट ........


शिवस्मारक उदघाटनावेळी अध्यक्ष असणाऱ्या मेटेंना डावलण्यात आले होते.
 त्यावेळीच त्यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती. 


एखादी इच्छित गोष्ट जेव्हा मिळत नसल्याचे लक्ष्यात येते अन मिळून जरी आली तरी तिची लाभ मनसोक्त लाभ घेण्याची आपलीच कमाल मर्यादा संपत आली असेल तर मग त्या मिळालेल्या गोष्टीचे मूल्य असून देखील किती असते हे बहुदा आ विनायक मेटे यांना उमजले असावे अन त्यातून त्यांनी मंत्रीपदाची लालसा सोडून दिल्याची कालपरवा घोषणा केली . या घोषणेमागे जिल्ह्यातील राजकीय प्रस्थवाढही असू शकते. शिवाय बीड जिल्ह्यातील सत्तेच्या सहभागाचे गणित जुळवायच्या उद्देशातूनही हि चाल खेळली गेली असेल.

 आ विनायक मेटे यांनी गेली दहा वर्षे देव पाण्यात घातले असतील ते फक्त लाल दिव्यासाठी. मेटेंना मिळणाऱ्या लाल दिव्याच्या प्रतीक्षेत लाल दिव्यावरच बंदी आली आणि सोबतच मेटेंनाही आता लाल दिवा नकोसा झाला आहे. या हवेसे वाटणाऱ्या आणि उराशी स्वप्न बाळगलेल्या मंत्रिपदसाठी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे गरजेचे आहे तो विस्तार जवळपास ६ महिने लांबणीवर आहे. यातून मंत्रिपद मिळालेच तर दस्तरखुद्द मेटेंनीच सांगितले कि आपल्याला कार्यपद्धती समजण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागेल. म्हणजेच मेटेंना त्यांचे मित्र मुख्यमंत्रीमहोदयांनी मंत्रिपद देतो म्हणत आणि जिल्ह्यातूनच अडकवत युतीतही नुसतं झुलवत ठेवण्यात आले असे दिसून येते. 
  ''मेटे जिकडे सत्ता तिकडे'' असे समीकरण गेल्या निवडणुकांमधून दिसून येत असले तरी मेटेंना जाणीवपूर्वक मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलेले आहे. मुख्यमंत्रीमहोदयांनी याची शिताफीने सारवासारव करत मेटेंना शिवस्मारकाच्या अध्यक्षपद देण्यात आल्याचे सांगत ते एखाद्या मंत्रिपदासारखे आहे असे जाहीर केले. मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या मेटेंना आधी आघाडीकडून आणि आता युतीकडूनही मंत्रिपदासाठी डावललल्याचे दिसून येत आहे. शिवस्मारक समिती अध्यक्षपद, विधानसभा आणि विधानपरिषदेतील प्रत्येकी १-१ सदस्यत्व, बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि पंचायत समितीतील सभापतिपद असलेल्या मेटेंना आता जिल्ह्यातील सत्ता बळकट करत आपला राजकीय दबदबा वाढवायचाहि असू शकतो. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता भाजपाकडे आकर्षित राहणार असल्याचे दिसून येत असल्यानेच अल्टिमेटम, डेडलाईन, त्यात मुदतवाढ करूनही मंत्रिपद न मिळालेल्या नाराज मेटेंनी सत्तेला लाथाडी न मारता समजूतदारपणाची भूमिका घेत मंत्रिपदाच्या शर्यतीत हिस्साच न घेण्याचे जाहीर केले आहे. 
    जिल्ह्यातच त्यांना मतांच्या ध्रुवीकरणासाठी स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी सोबत घेतले होते. यानंतर त्यांनी इतरही रिपाई, स्वा.शे.स., रासप या पक्षांची मोट बांधण्यात स्व. गोपीनाथ मुंडेंना मोलाचे सहकार्य केले. त्यांच्यापश्चात मात्र मेटेंना येथील ओबीसी नेत्यांशी मंत्रिपदासाठी संघर्ष करावा लागला. तिकडे रिपाई केंद्रात गेले, स्वाभिमानी - रासपला राज्यात मंत्रिपद मिळाले मात्र मेटे आमदारचे नामदार न राहताच राहिले. मात्र यातून मेटेंनी नाराजीचा सूर आवळत आपण मंत्रिपदाची आशा सोडली असल्याचे जाहीर करून डेडलाईनच्या तलवारीला म्यान केले. एकूणच मेटेंच्या मंत्रिपदाच्या स्वप्नांच्या भंग पावण्यातून त्यांच्यावर द्रांक्षेच आबंट आहेत असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या एवढ्या प्रकारास जबाबदार कोण आहे हे सांगण्यासाठी बहुधा ज्योतिषाची गरज नसावी. 

धनंजय गुंदेकर, बीड 9689043949

1 comment:

  1. आ विनायक मेटे यांनी गेली दहा वर्षे देव पाण्यात घातले असतील ते फक्त लाल दिव्यासाठी. मेटेंना मिळणाऱ्या लाल दिव्याच्या प्रतीक्षेत लाल दिव्यावरच बंदी आली आणि सोबतच मेटेंनाही आता लाल दिवा नकोसा झाला आहे.

    ReplyDelete