Monday, 8 May 2017

काँग्रेस, स्थानिक पक्षांना कमकुवत बनवून भाजपा एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात



भाजपाबरोबरच स्थानिक पक्षांच्या आहोटीस अस्मिता अन काँग्रेसमुक्त भारतास काँग्रेसजन ठरताहेत जबाबदार 


  काँग्रेसच्या राजवटीला सुरुंग लावत २०१४ च्या लोकसभेत एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजप पक्ष सध्या देशात एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील वातावरणही आरएसएस आणि काँग्रेसजनांच्या उदासीन राजकीय धोरणामुळे त्यांना पोषक बनतही आहे. कालपरवा भाजपा पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ६०० पेक्षा जास्त स्वयंसेवक येणाऱ्या निवडणुकांसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पाठविले आहेत. आरएसएस आणि भाजपा आपला अजेन्डा आणि अभियान उघड राबवत असते त्याचवेळेस ते त्यापेक्षा जास्त अंधारातूनही राबवत असते. आज जरी ६०० स्वयंसेवक राजकीय विश्लेषण व अंमलबजावणीसाठी पाठविल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी ते त्यापेक्षा शेकडो पटींनी अधिक असू शकतात. देशातील काही राज्यांमध्ये कमळाचा मागमूसही नसताना त्या राज्यात आता भाजप स्थिरस्थावर होत आहे. ईशान्येची राज्ये, प बंगाल, तमिळनाडू, पंजाब सारख्या राज्यांमध्ये भाजपा पहिल्यापेक्षा जास्त प्रबळ बनली आहे.
  युती, आघाडी करत सत्तेत भागीदार होणारा भाजप पक्ष आता थेट त्या त्या राज्यात स्वबळावर लढत सत्ता मिळवत आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या राज्यात उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत होते त्या राज्यांमध्ये भाजपचे उमेदवार एक तर निवडून येत आहेत किंवा ते दुसऱ्या स्थानी असतात. भाजपने महाराष्ट्रात शिवसेना, काश्मिरात पीडीपी यांच्यासोबत अपरिहार्यता म्हणून युती ठेवली आहे मात्र पंजाब, गोवा व इतर राज्यांमधील युतीला त्यांनी टाळत एकहाती सत्तेसाठी प्रयत्न केलेले आहेत. पूर्ण बहुमताने भाजप शासित राज्यांमध्ये भाजपाकडून त्यांच्या विचारसरणीनुसार शासन चालविले जात आहे. भाजपा लहान राज्यांचे समर्थन करते, शहरीकरणावर या पक्षाचा भर आहे व याच नीतीवर आज केंद्र व राज्य शासन चालविले जात असून शेतकऱ्यांना उपाशी मारण्याचे कर्तबही भाजपच्या धोरणातूनच उगलेले आहेत.
   अचंबाची घटना म्हणजे भाजपच्या उच्च वर्णिय नेतृत्वांचा स्वीकार देशभरातील सर्वच थरातून केला जात आहे. आजघडीला केंद्रीय तसेच राज्यातील मंत्रिमंडळात उच्चवर्णीय अधिक असतानाही कसलीही कानकून केली जात नाही. काँग्रेसच्या राजवटीचा लोकांना सरळसरळ विसरच पडलेला आहे. मीडियातून काँग्रेसच्या चुकांवर कचकाटून रगडण्यात आल्याने सामान्यांना काँग्रेस खलनायकच्या भूमिकेत दिसून येत आहे. मणिपूर, गोवा या राज्यात काँग्रेस चांगले संख्याबळ घेऊनही विजयी होऊ शकली नाही याचे कारण राहुल गांधींची निष्क्रियता हे दाखवण्यात आले असले तरी यावेळी काँग्रेसची तज्ञ मंडळी कुठे गेली होती? कपिल सिब्बल, जयराम रमेश यासारखी कित्येक नावे सध्या चर्चेच्या बाहेर आहेत ते असे का करत आहेत? राहुल गांधींकडे बोट दाखवत सर्व आपली पापांना झाकून ठेवण्याचे काम करत आहेत. काँग्रेसची पकड जी काही ढिली होत आहे त्यासाठी आजघडीला काँग्रेसजनच जबाबदार आहेत.
   काँग्रेबरोबरच अस्मितेच्या राजकारणावर आजपर्यंत अबाधित राहिलेल्या स्थानिक पक्षांना आता भाजपच्या राष्ट्रवादाच्या आव्हानाने दुय्यम स्थानावर फेकलेले आहे. एका राज्यापुरते सीमित असणे, मोठमोठे प्रकल्प केंद्राच्या मेहरबानीवर अवलंबून असणे, केंद्रात भाजपचे सरकार असल्याने बिगरभाजपशासित राज्यांना डावलण्याचा प्रकार अधिक होतो यातून आपल्या दारात येऊन मतदान मागण्याची आणि विकासाची हमी देणाऱ्या भाजपाकडे मतदारांचा कौल आपोआपच सरकतो. आजघडीला छुपा हिंदुत्ववाद वाढविणाऱ्या भाजपाकडे उघडपणे सर्वधर्मसमभाव जपला जात आहे. यातूनच स्थानिक पक्षांपेक्षा एकच पक्ष, एकच झेंडा अन केंद्र आणि राज्य आपले याच धोरणातुन देशभरात भाजपला पसंती आणि स्थानिक पक्षांना दुय्यम स्थान दिले जात आहे. यातूनच देशभरातील लोकसभा निवडणुकांवेळी विधानसभा निवडणुकांही घेण्याचा विचार पंतप्रधानांच्या विचाराधीन आहे.
   देशभरातील स्थानिक पक्षांचे प्रभावी नेते आता चर्चेच्या एक तर बाहेर आहेत किंवा त्यांच्यावर त्यांचा प्रभाव कमी करणारे आरोप लावले जात आहेत. यातून स्थानिक पक्षांच्या प्रभावही खिळखिळा करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहेच. भाजपच्या अजेंड्याला प्रभावीपणे राबविण्यास सिंहाचा वाटा  असणाऱ्या  आरएसएसचे कित्येक छुपे स्वयंसेवक आता इतर पक्षांच्या मुख्य कमिटीतही प्लांट केले गेले आहेत. काँग्रेसपासून ते आताच्या नव्या दमाच्या आप पक्षांपर्यंत आरएसएसचे लागेबंध असणारे कित्येक स्वयंसेवक शिस्तीत भाजपासाठी काम करत आहेत. यातूनच काँग्रेसच्या कमकुवत होण्याने आणि स्थानिक पक्षच्या आहोटीने देशात भाजपाला एकहाती सर्वच थरात सत्ता मिळवण्याचे कुरण तयार होत आहे. येणारी लोकसभा हि पण भाजपाचीच असेल असे भाकीत वर्तवणारांना सत्य आहे असे वाटत असले तरी अजूनही काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांसाठी वेळ गेलेली नाही परंतु हा भाजपचा विजयाचा उधळलेला वारू थोपवणे एवढेही आता सोपे राहिले नाही..... 

धनंजय गुंदेकर, बीड

3 comments: